आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध दाद मागण्याची बॉक्सिंगपटू सरिता देवीची पद्धत चुकीची असेल; मात्र तिला पुन्हा खेळायची संधी मिळायला हवी, असे मत अव्वल टेनिसपटू सानिया मिर्झाने व्यक्त केले.
‘‘सरिताच्या लढतीत नेमके काय घडले, हे सर्वानी पाहिले आहे. त्यानंतर संबंधित पदाधिकाऱ्यांनी योग्य पावले उचलत सरिताला न्याय मिळेल, याची तरतूद करायला हवी होती. मात्र तसे घडले नाही. पदक प्रदान समारंभाच्या वेळी सरिताच्या भावना अनावर झाल्या. पदक नाकारल्याने तिच्यावर बंदीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तिला खेळायची संधी मिळायला हवी. ऑलिम्पिक किंवा आशियाई क्रीडा स्पर्धेपर्यंत पोहोचण्यासाठी जीवापाड मेहनत घ्यावी लागते. सरिताची आतापर्यंतची कामगिरी देशवासियांना अभिमानास्पद अशी आहे. त्यामुळे सरिताला माझा पाठिंबा आहे,’’ असे सानियाने सांगितले. ‘‘आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा अतिशय तीव्र असते, दडपणाच्या क्षणी भावनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे,’’ अशी सूचनाही सानियाने केली.
यंदाच्या वर्षांतील दिमाखदार प्रदर्शनाबाबत सानिया म्हणाली, ‘‘एकाच वर्षांत आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक आणि प्रतिष्ठेच्या वर्ल्ड टूर फायनल्स स्पर्धेचे जेतेपद मिळवता आल्याने समाधानी आहे. दुखापतींचे व्यवस्थापन करू शकल्याने संपूर्ण वर्षभरात सातत्यपूर्ण प्रदर्शन करता आले. आंतरराष्ट्रीय टेनिसचे व्यग्र वेळापत्रक खेळाडूंना दमवणारे असते. जागतिक क्रमवारीत अव्वल तीसमध्ये असताना एकेरी सोडण्याचा निर्णय कठोर होता. मात्र दुहेरीत चांगली कामगिरी करण्याच्या दृष्टीने तो अपरिहार्य होता. या निर्णयाचे सकारात्मक परिणाम माझ्या आताच्या कामगिरीत दिसत आहेत.’’
‘‘इंटरनॅशनल प्रीमिअर टेनिस लीग (आयटीपीएल)च्या निमित्ताने आम्ही वेगळ्या स्वरूपाचे टेनिस खेळणार आहोत. रॉजर फेडररचा समावेश असलेल्या संघाचा भाग असणे हुरूप वाढवणारे आहे. चॅम्पियन्स टेनिस लीग (सीटीएल) आणि आयटीपीएल या स्पर्धा एकमेकांच्या प्रतिस्पर्धी नाहीत, दोन्ही स्पर्धामुळे टेनिस अधिकाअधिक लोकांपर्यंत पोहोचेल आणि ते महत्त्वाचे आहे,’’ असे सानियाने स्पष्ट केले.
‘‘टेनिस हा महागडा खेळ आहे. निधी आणि पायाभूत सुविधा सहजपणे उपलब्ध होत नाहीत. एका छत्राखाली सर्वसमावेशक सुविधा मिळाव्यात, यासाठीच अकादमीची स्थापना केली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेला टक्कर देण्यासाठी अकादमी प्रारूप विकसित होण्याची गरज आहे. सरकार आणि उद्योगविश्वाने साथ दिल्यास टेनिसचा व्यापक प्रचार होऊ शकतो,’’ असे तिने यावेळी सांगितले.
लक्षवेधक होण्यासाठी सानिया पुरुषांना मार्गदर्शन करणार
‘सोनी पिक्स’ वाहिनीच्या ‘पिक्स स्कूल ऑफ बाँडिंग’ उपक्रमात सानिया सहभागी झाली असून, दर शनिवारी या वाहिनीवर दाखवण्यात येणाऱ्या जेम्स बाँडच्या चित्रपटादरम्यान ग्लॅमरस अवतारातील सानिया ‘बाँड’प्रमाणे लक्षवेधक होण्यासाठी पुरुषांना मार्गदर्शन करताना दिसणार आहे.