अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये पार पडलेल्या टी २० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघानं विश्वविजयी कामगिरी केली. दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषकावर आणि चौथ्यांदा तिन्ही प्रकारांतील विश्वचषकावर भारतीय संघानं आपलं नाव कोरलं. भारताच्या या विजयात सिंहाचा वाटा उचलणारा जसप्रीत बुमराह मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. अवघ्या देशात भारतीय संघ आणि जसप्रीत बुमराहच्या नावाचा जयघोष चालू असताना बुमराहची पत्नी संजना गणेशन एक्स या सोशल मीडिया साईटवर एका युजरवर चांगलीच भडकली आहे. एवढंच नाही, तर तिनं या युजरला थेट कायदेशीर कारवाईचा इशाराच दिला आहे.
टी २० विश्वचषक स्पर्धेत विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ गुरुवारी मायदेशी परतला. यावेळी दिल्लीच्या आयटीसी आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतीय संघाचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. बीसीसीआयचे अनेक पदाधिकारीही विश्वविजेत्या भारतीय संघाच्या स्वागतासाठी हजर होते. भारतीय संघाच्या स्वागताचे आणि विश्वचषकासोबतचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. BCCI नंदेखील भारतीय संघाचा शेअर केलेला एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
संजना गणेशनच्या नावाचा गैरफायदा!
एकीकडे भारतीय संघ मायदेशी परतत असताना दुसरीकडे संजना गणेशननं एक्स युजरला दिलेला इशारा चर्चेचा विषय ठरत आहे. संजना गणेशन क्रीडा पत्रकार असून स्प्लिट्सविलामधील स्पर्धकही होती. बुमराहशी विवाह केल्यानंतर संजना गणेशन क्रिकेट चाहत्यांमध्ये सर्वशृत असं नाव झालं. मात्र, याचाच गैरफायदा घेण्याचा प्रयत्न काही युजर्सकडून करण्यात येत आहे. या प्रकारांची दखल संजना गणेशन हिने घेतली असून संबंधित युजरला तिनं कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.
संजना गणेशनच्या प्रसिद्धीचा गैरफायदा घेण्यासाठी एका एक्स युजरनं तिच्या नावाने अकाऊंट सुरू केलं आहे. या अकाऊंटवरून संजना गणेशनसंदर्भातील माहिती हा युजर पोस्ट करत असल्याचं लक्षात आल्यानंतर तिने या युजरच्या पोस्टवरच त्याला सुनावलं आहे.
जसप्रीत बुमराह-संजना गणेशनचे फोटो केले पोस्ट
या युजरनं संबंधित अकाऊंटवरून विश्वचषकासोबतचे बुमराह व संजना यांचे फोटो पोस्ट केले आहेत. तसेच, या फोटोंमध्ये बुमराहचा चिमुकला मुलगाही दिसत आहे. यावरून संजना चांगलीच भडकली असून तिनं या पोस्टच्या कमेंटमध्येच आपला संताप व्यक्त केला आहे.
“हाय, ही एक चोरलेली ओळख असून इथे पोस्ट झालेले फोटोही चोरलेले आहेत. मी ‘एक्स’कडे या खात्यासंदर्भात तक्रार केली आहे. हे फोटो काढा आणि हे खातं बंद करा. नाहीतर मला यावर कायदेशीर कारवाई करावी लागेल”, असं संजना गणेशननं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.