विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात होऊन अनेक दिवसांचा कालावधी गेला. मात्र भारतीय संघाच्या पराभवावरुन होणाऱ्या चर्चा अद्याप थांबत नाहीयेत. उपांत्य सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध भारतीय फलंदाजी कोलमडत असताना धोनीला सातव्या क्रमाकांवर फलंदाजीसाठी पाठवण्यात आलं. भारतीय संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयावर नंतर टीकाही करण्यात आली. संघाचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी हा निर्णय घेतल्याचं समोर येताच, बांगर यांना सोशल मीडियावर टीकेचं धनी व्हायला लागलं होतं. मात्र धोनीला सातव्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्याचा निर्णय मी एकट्याने घेतला नसल्याचं बांगर यांनी म्हटलं आहे.
“तो निर्णय मी एकट्याने नक्कीच घेतला नव्हता. त्यावेळी आम्ही प्रत्येक शक्यतेचा विचार केला होता. स्पर्धेच्या सुरुवातीला प्रत्येक खेळाडूचा फलंदाजी क्रम ठरलेला होता. मात्र पाचव्या, सहाव्या आणि सातव्या क्रमांकासाठी आम्हाला मधल्या फळीत अधिक लवचिकता हवी होती. धोनी फलंदाजीत खालच्या क्रमांकावर येऊन फलंदाजीला येऊ शकतो, असा संघाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. धोनीसारखा अनुभवी फलंदाज अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करु शकतो असं आम्हाला वाटलं होतं. याचमुळे आम्ही उपांत्य सामन्यात धोनीला सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्याचा निर्णय घेतला.”
उपांत्य सामन्यात आमची आघाडीची फळी झटपट माघारी परतल्यानंतर दिनेश कार्तिकला फलंदाजीमध्ये बढती देण्याचा निर्णय घेण्यात आला. धोनी सातव्या क्रमांकावर येऊन फटकेबाजी करेल अशी आशा होती. त्यामुळे सर्वांनी मिळून धोनीला सातव्या क्रमांकावर पाठवण्याचा निर्णय घेतला, मात्र यासाठी मला एकट्याला दोषी का ठरवण्यात येतं हे कळत नाही. बांगर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ३ ऑगस्टपासून भारतीय संघाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याला सुरुवात होणार आहे.