Sanjay Bangar thinks Virat Kohli should play T20 World Cup: भारताचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या भारताच्या टी-२० संघातून बाहेर आहे. कोहलीने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये इंग्लंडविरुद्ध शेवटचा टी-२० सामना खेळला होता आणि हा सामना टी-२० विश्वचषक स्पर्धेचा उपांत्य सामना होता, ज्यामध्ये इंग्लंडने भारताचा १० गडी राखून पराभव केला होता. त्या सामन्यापासून भारतीय संघाने ५-६ टी-२० मालिका खेळल्या आहेत, परंतु विराट कोहली एकाही मालिकेत खेळलेला नाही. अशा स्थितीत कोहलीला पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकात खेळणे कठीण जात आहे. यावर आता भारताचे माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
विराटने टी-२० विश्वचषक खेळावा – बांगर
टीम इंडियाचे माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर म्हणाले की, विराट कोहलीला पुढील वर्षी जूनमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकात खेळताना नक्कीच बघायला आवडेल. विराटने टी-२० विश्वचषकात खेळावे आणि संघ व्यवस्थापनानेही त्याला खेळवावे, अशी माझी १०० टक्के इच्छा आहे, असे संजय बांगर म्हणाले. संजय बांगर म्हणाले की, आम्ही गेल्या वर्षी पाहिले होते की, तो टी-२० फॉरमॅटमध्ये काय करू शकतो? मला समजत नाही की त्याला खेळू न देण्याचे कारण काय असेल?
कोहली गेल्या टी-२० विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता –
क्रिकेट बासू या यूट्यूब चॅनलवर दिलेल्या मुलाखतीदरम्यान संजय बांगर म्हणाले, “विराट कोहलीने १०० टक्के टी-२० संघाचा भाग असावा. गेल्या वर्षी टी-२० विश्वचषकात त्याने अतितटीच्या सामन्यांमध्ये काय केले, ते आपण पाहिले आहे. तो टी-२० विश्वचषक का खेळू शकत नाही, याचे कारण मला समजत नाही.”
संजय बांगर पुढे म्हणाले, “मोठ्या सामन्यांमध्ये चाहत्याच्या भावना खूप हाय असतात, हे तुम्हाला माहीत आहे. अशा परिस्थितीत एक छोटीशी चूक तुम्हाला महागात पडू शकते. म्हणूनच तुम्हाला अशा परिस्थितीतून गेलेले मोठे खेळाडू हवे आहेत. अशा स्थितीत तुमचा स्ट्राइक रेट किंवा आयपीएल कामगिरी महत्वाची नसते. भारत-पाकिस्तान सामन्यात त्याने (कोहली) खेळाप्रती समर्पण दाखवले.”
टी-२० विश्वचषक २०२३ मध्ये विराट कोहली सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. त्याने ६ सामन्यात ९८.६७ च्या सरासरीने २९६ धावा केल्या होत्या. विराट कोहलीने भारताकडून आतापर्यंत खेळलेल्या ११५ टी-२० सामन्यांमध्ये ४००८ धावा केल्या आहेत. कोहलीने टी-२० मध्ये भारताकडून फलंदाजी करताना एक शतक आणि ३७ अर्धशतके झळकावली आहेत.