वनडे वर्ल्डकप २०२३ सुरु होण्यासाठी आता खूप कमी दिवसांचा कालावधी राहिला आहे. या मोठ्या टूर्नामेंटसाठी टीम इंडियाने जोरदार तयारी सुरु केली आहे. परंतु, हा विश्वचषक सुरु होण्यापूर्वी टीम इंडियासाठी चौथ्या नंबरवर कोणता खेळाडू फलंदाजी करणार, हा चिंतेचा विषय बनला आहे. मागील काही वर्षांपासून भारताला नंबर चारसाठी धडाकेबाज खेळाडू मिळाला नाहीय. याच पार्श्वभूमीवर भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी नुकतीच प्रतिक्रिया दिली.
शास्त्री म्हणाले की, “वनडे वर्ल्डकप २०१९ मध्ये निवडकर्त्यांशी मी अनेकदा चर्चा केली होती. दिग्गज फलंदाज विराट कोहलीने चार नंबरवर फलंदाजी करावं आणि मध्यम क्रमवारीची गुंतागुंत सोडवावी, असं मला वाटत होतं.” मात्र, अनेक माजी क्रिकेटर्सला शास्त्रींची रणनिती योग्य वाटली नाही. तसंच २००७ च्या वनडे वर्ल्डकपमध्ये दिग्गज सचिन तेंडुलकरसोबत जे घडलं, त्या गोष्टींही शास्त्रींना सांगितल्या आहेत. त्या वर्ल्डकपमध्ये सचिनला खालच्या क्रमवारीत फलंदाजी करण्यासाठी पाठवण्यात आलं होतं आणि सचिनला दोन सामन्यांमध्ये फक्त ७ धावाच करता आल्या. ज्यामध्ये दोन सामन्यांत भारताचा पराभव झाला होता.
भारताचे माजी क्रिकेटर संजर मांजरेकर यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलं की, २००७ च्या विश्वचषकात सचिन तेंडुलकरसोबत काय घडलं होतं, हे लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही इशान किशनसारख्या अन्य विकल्पांबाबत चर्चा करता, त्यावेळी कोहलीच्या फलंदाजीचा क्रम खाली नेला जातो. म्हणजेच कोहली एकप्रकारे बळीचा बकराच बनला आहे. कोहलीला तुम्ही या नंबरवर फलंदाजीसाठी पाठवून तुमच्या सर्व समस्यांना संपवण्याचा प्रयत्न करत आहात.
याशिवाय ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर टॉम मूडी यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिलीय. ते म्हणाले, “भारतीय क्रिकेटमध्ये एक सांस्कृतिक मुद्दा आहे. २००७ वर्ल्डकपमध्ये राहुल द्रविड आणि ग्रेग चॅपलच्या संघ व्यवस्थापनाने सचिन तेंडुलकरला सलामीच्याऐवजी ४ नंबरवर फलंदाजी करण्यासाठी पाठवलं. कारण त्यावेळी वीरेंद्र सेहवाग आणि अन्य खेळाडू टॉप ऑर्डरमध्ये होते. परंतु, हा निर्णय चर्चेचा विषय बनला होता. नंबर चारवर फलंदाजी करणं योग्य असेल की नाही, हे आता कोहलीच्याच हातात आहे. “