IND vs BAN 2nd Test Updates: भारत आणि बांगलादेश यांच्यातील कानपूर कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे लंचब्रेकनंतर रद्द करण्यात आला. तर दुसऱ्या दिवसाचा खेळही पावसामुळे उशिरा सुरू होणार आहे. शुक्रवार, २७ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या कसोटीच्या पहिल्या दिवशी केवळ ३५ षटकांचा खेळ होऊ शकला, ज्यामध्ये बांगलादेश संघाने प्रथम फलंदाजी करताना ३ गडी गमावून १०७ धावा केल्या. भारताने नाणेफेक जिंकून कर्णधार रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण सामन्याच्या सुरूवातीला या निर्णयाचा भारताला फारसा फायदा झाला नाही. यामुळे भारताचे माजी खेळाडू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी रोहित शर्माच्या नेतृत्त्वावर प्रश्नचिन्ह उचलणाऱ्या मुद्द्याकडे सर्वांचं लक्ष वेधलं.

कानपूर कसोटीत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारतीय संघ बराच काळ पहिल्या विकेटच्या प्रतिक्षेत होता. भारतीय संघाला अपेक्षित असलेली मदत वेगवान गोलंदाजांना मिळाली नाही. ग्रीन पार्क स्टेडियमवर पावसामुळे सामना उशिरा सुरू झाला. कानपूरमधील स्थिती पाहता कदाचित भारतीय संघ व्यवस्थापनाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो कानपूरसह भारतातील कोणत्याही मैदानावरील कसोटी सामन्यात क्वचितच पाहायला मिळतो.

हेही वाचा – IND vs BAN: विराट कोहली २२ वर्षीय नेट बॉलरकडून सलग दोन वेळा बाद; भेदक गोलंदाजी पाहून विराटने विचारलं, “अरे तू किती…”

माजी भारतीय क्रिकेटरने रोहित शर्माच्या नेतृत्त्वावर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह

इतकंच नाही तर ९ वर्षांनंतर भारतात खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा स्थितीत रोहितच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यानंतर टीम इंडियाला अपेक्षेप्रमाणे सामन्याच्या सुरूवातीला यश मिळाले नाही. पण भारताने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ३ विकेट्स मिळवल्या.

कर्णधार रोहितने सुरूवातीला ४ गोलंदाजांना गोलंदाजी दिली, ज्यामध्ये तिन्ही वेगवान गोलंदाज आणि रविचंद्रन अश्विनने ही ३५ षटके टाकली. यामध्ये २ विकेट वेगवान गोलंदाज आकाश दीपने तर एक विकेट अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने घेतली. तर डावखुरा फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजाला एकही षटक टाकण्याची संधी दिली नाही. रोहितच्या या निर्णयावर माजी भारतीय फलंदाज आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. डावखुऱ्या फलंदाजांनी भरलेल्या बांगलादेशच्या टॉप ऑर्डरविरुद्ध रवींद्र जडेजाला गोलंदाजी का दिली नाही असा त्यांचा सवाल होता.

हेही वाचा – IND vs BAN: सरप्राईज, सरप्राईज…, आकाशदीपची भेदक गोलंदाजी अन् परफेक्ट निर्णय, रोहित शर्माही झाला अवाक्, पाहा VIDEO

संजय मांजरेकरांनी रोहित शर्माला का सुनावलं?

मांजरेकर यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आणि डावखुरा फलंदाज असलेल्या इंग्लंडचा माजी कर्णधार ॲलिस्टर कुकचे उदाहरण देऊन रोहित शर्माला जडेजाच्या कामगिरीची आठवण करून दिली. बांगलादेशच्या टॉप ७ पैकी ५ फलंदाज डाव्या हाताने फलंदाजी करतात. त्यामुळे मांजरेकर यांनी रोहितला त्यांच्याविरुद्ध शक्य तितकी ऑफस्पिन गोलंदाजी करण्याचा सल्ला दिला. कानपूर कसोटीच्या पहिल्या दिवशी अश्विन डावाच्या सुरुवातीला गोलंदाजी करायला आला, पण जडेजाला एकही षटक मिळाले नाही.

हेही वाचा – IND vs BAN: मुंबईकरांना खड्ड्यांची सवय, रस्ते बांधणाऱ्यांचं उखळ पांढरं, गावस्करांनी कॉमेंट्री करताना लगावला टोला

संजय मांजरेकर यांनी त्या पोस्टमध्ये स्पष्टपणे आपला राग व्यक्त केला. मांजरेकरांनी पोस्टमध्ये लिहिले की, रोहित शर्माला हे आकडे दाखवण्याची गरज आहे. असं म्हणत त्यांनी खाली आकडेवारी मांडली. ही आकडेवारी भारत आणि इंग्लंड यांच्यातील २०१६ च्या कसोटी मालिकेतील होती, ज्यामध्ये जडेजाने डावखुरा फलंदाज आणि माजी इंग्लंडचा कर्णधार ॲलिस्टर कुकला ८ डावांत ६ वेळा बाद केले होते आणि त्याच्याविरुद्ध फक्त ७५ धावा खर्च केल्या. पुढे मांजरेकर यांनी लिहिले की, जेव्हा जेव्हा डावखुरा फलंदाज क्रीजवर असतो तेव्हा रोहित जडेजाला पटकन गोलंदाजी देत नाही.