India vs South Africa Series, Sanjay Manjrekar: भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी टी-२० विश्वचषक हंगामात वन डे आंतरराष्ट्रीय मालिका आयोजित केल्याबद्दल दक्षिण आफ्रिकेच्या बोर्डावर टीका केली आहे. मांजरेकर यांनी क्रिकेट दक्षिण आफ्रिकेवर निशाणा साधताना या सामन्यांचे निकाल कोणालाच आठवणार नाहीत, असे म्हटले आहे. ते म्हणाले, ज्यावेळी जे गरजेचे असते ते आपण करणे आवश्यक आहेत. सध्या आपण टी-२० विश्वचषक आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.”
एकदिवसीय विश्वचषक २०२३ संपला आहे आणि संघांनी आगामी टी-२० विश्वचषकाची तयारी सुरू केली आहे. पुढील मोठ्या स्पर्धेपूर्वी भारतीय संघाला आता फक्त ५ टी-२० सामने खेळायचे आहेत. त्याच वेळी, भारताला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळायची आहे, त्यापैकी पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. याशिवाय एकदिवसीय आणि कसोटी मालिकाही येथे आयोजित केल्या गेल्या आहेत.
हेही वाचा: IND vs SA 1st T20 : भारत-दक्षिण आफ्रिकेतील पहिला सामना रद्द, ‘या’ तारखेला होणार दुसरी लढत
माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी दक्षिण आफ्रिका बोर्डावर टीका करताना म्हटले की, “आम्ही दक्षिण आफ्रिकेच्या रणनीतीबद्दल बोलत होतो, या दौऱ्याबाबत त्यांना काही वेगळे करता आले असते का? कारण, आगामी टी-२० विश्वचषकाचा विचार करता तीन टी-२० सामन्यानंतर एकदिवसीय मालिकेला काहीही अर्थ राहत नाही. जेव्हा पुढचा विश्वचषक टी-२० विश्वचषक असेल तेव्हा आपण त्या दृष्टीने योजना आखणे गरजेचे आहे.”
मांजरेकरांनी सुचवले की, “आफ्रिकन बोर्डाने संघ आणि प्रायोजक दोघांचाही सल्ला घ्यावा की ते काय पसंत करतील.” मांजरेकर पुढे म्हणाले, “कदाचित आपण या मालिकेतील संघ आणि सर्व गुंतवणूकदारांशी चर्चा केली पाहिजे आणि त्यांना तीन एकदिवसीय ऐवजी तीन टी-२० घ्यायला भाग पाडले पाहिजे. चाहत्यांना टी-२० पाहायला आवडतील की नाही हे बोर्डाने शोधून काढले पाहिजे कारण, हा टी-२० आंतरराष्ट्रीय हंगाम आहे. टी-२० हंगामात वन डेची गरजच काय?” असा प्रश्नही त्यांनी विचारला.
भारताला दक्षिण आफ्रिकेत तीन टी-२० सामने खेळायचे असून त्यानंतर तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेला १७ डिसेंबरपासून सुरूवात होईल आणि २१ डिसेंबरला शेवटचा सामना असेल. या मालिकेबाबत माजी क्रिकेटपटू म्हणाला की, “या सामन्यांचे निकाल काय होते हे कोणालाच आठवणार नाही कारण, कोणालाच त्याची पर्वा नाही. सध्या टी-२० विश्वचषक येत असल्याने त्यावर खूप चर्चा आहे.”