वादग्रस्त माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांचे निकटवर्तीय असलेल्या संजय सिंह यांची गुरूवारी ( २१ डिसेंबर ) भारतीय कुस्ती महासंघाच्या ( डब्ल्यूएफआय ) अध्यक्षपदी निवड झाली होती. या निवडीनंतर कुस्तीपटू साक्षी मलिकनं खेळातून निवृत्तीची घोषणा केली. तर, कुस्तीपटू बजरंग पुनियानं ‘पद्मश्री’ पुरस्कार परत केला होता. यातच आता क्रीडा मंत्रालयानं भारतीय कुस्ती महासंघाच्या नवनियुक्त कार्यकारणीला बरखास्त केलं आहे. हा संजय सिंह यांच्यासह कुस्ती महासंघातील सदस्यांना मोठा धक्का मानला जात आहे. अशातच संजय सिंह यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
“ब्रिजभूषण शरण सिंह आणि साक्षी मलिक यांनी कुस्ती महासंघाच्या नवनियुक्त कार्यकारणीला शांततेत कार्य करून द्यावं. मुलांचं भविष्य घडून द्यावं. राष्ट्रीय स्पर्धा होण्याआधीच सतत काहीतरी घटना घडत आहे,” अशी नाराजी संजय सिंह यांनी व्यक्त केली. ते ‘एएनआयशी’ संवाद साधत होते.
हेही वाचा : “माझा लढा सरकारविरोधात…”, कुस्ती महासंघाची कार्यकारिणी बरखास्त होताच साक्षी मलिकची पहिली प्रतिक्रिया
संजय सिंह म्हणाले, “ब्रिजभूषण शरण सिंह यांनी कुस्तीतून निवृत्ती घेतल्याचं सांगितलं आहे. तर, साक्षी मलिकनेही कुस्तीतून निवृत्ती घेतली आहे. आरोप लागलेले आणि लावणारे दोघांनीही निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे दोघांनी निवनियुक्त कार्यकारणीला शांततेत कार्य करत मुलांचं भविष्य घडवून द्यावं. राष्ट्रीय स्पर्धा होण्याआधीच काहीतरी घटना घडत आहेत.”
ब्रिजभूषण सिंह यांच्याशी असलेल्या मैत्रीच्या संबंधावरही संजय सिंह यांनी भाष्य केलं आहे. “ब्रिजभूषण सिंह हे क्षत्रिय समाजातून येतात. तर, मी भूमिहार समाजातून येतो. मग, मी त्यांचा निकटवर्तीय कसा होईल? ब्रिजभूषण सिंह कुस्ती महासंघाचे अध्यक्ष असताना मी सहसचिव होतो. मग, अध्यक्ष आणि सहसचिवांमध्ये मैत्रीचे संबंध असतात का नाही?” असा सवाल संजय सिंह यांनी उपस्थित केला.
ब्रिजभूषण सिंह काय म्हणाले?
“मी १२ वर्षे कुस्तीपटूंसाठी काम केलं. मी न्याय दिला की नाही, हे काळच सांगेल. आता सरकारबरोबर निर्णय आणि वाटाघाटी महासंघाचे निवडून आलेले लोक घेतील. मी कुस्तीतून निवृत्ती घेतली आहे,” असं ब्रिजभूषण सिंह यांनी म्हटलं.