टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आशिया कप २०२२ आणि त्यानंतर आयसीसी टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये खेळू शकला नाही. पाठीच्या दुखापतीमुळे बुमराह बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. बुमराह जानेवारीत श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियामध्ये परतणार होता, परंतु त्याच्या पाठीत जडपणा जाणवू लागल्याने त्याला पुन्हा संघातून बाहेर व्हावे लागले होते.
त्याचबरोबर संजू सॅमसनही गुडघ्याच्या दुखापतीतून बरा झाला आहे. तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतून पुनरागमन करू शकतो. दोन्ही खेळाडूंच्या फिटनेसबाबत ताजे अपडेट समोर आली आहे.
बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने इनसाइड स्पोर्ट्सला सांगितले की, ”संजू त्याच्या दुखापतीचे मूल्यांकन करण्यासाठी एनसीए येथे आला आहे. मी ऐकले आहे की, तो निवडीसाठी १०० टक्के फिट आहे. बुमराहबद्दल बोलायचे तर, त्याला पुनरागमन करण्यासाठी आणखी एक महिना लागू शकतो. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतून तो पुनरागमन करेल, असे मानले जात आहे. पण तो कितपत तंदुरुस्त आहे यावर सर्व काही अवलंबून आहे.”
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा १३ जानेवारी रोजी करण्यात आली. त्यामध्ये बुमराहचा समावेश नाही. या अपडेटनंतर तो उर्वरित दोन कसोटी सामने खेळू शकणार नसल्याचे मानले जात आहे. श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेदरम्यान सॅमसनला संघातून वगळण्यात आले होते. कारण झेल घेताना त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती.