Sanju Samson Revelas Suryakumar Yadav and Gautam Gambhir Support him : भारताचा यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसन म्हणाला की, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सतत अपयशी ठरल्यामुळे सुरुवातीला त्याला त्याच्या क्षमतेवर शंका निर्माण होऊ लागली होती. पण कर्णधाराच्या आणि प्रशिक्षकाच्या पाठिंब्यामुळे तो दमदार पुनरागमन करू शकला. सॅमसनने शुक्रवारी डर्बनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात ५० चेंडूत १०७ धावांची विस्फोटक फलंदाजी केली. या खेळीच्या जोरावर भारताने यजमान दक्षिण आफ्रिकेचा ६१ धावांनी पराभव करत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
मनात अनेक प्रश्न निर्माण होत होते –
सामन्यानंतर संजू सॅमसनने पत्रकार परिषदेत सांगितले की, “माझ्या कारकिर्दीत मी अनेक अपयशांचा सामना केला आहे. मला वाटतं जेव्हा तुम्ही अपयशातून जात, तेव्हा तुमच्या मनात अनेक शंका निर्माण होतात. यामध्ये सोशल मीडिया देखील नक्कीच भूमिका बजावते. तसेच स्वत:बद्दल अनेक प्रश्न निर्माण होतात. जसे की संजू, तू आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटसाठी बनला आहेस ना? आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करत आहेस, तर तू आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी का करत नाहीस? असे अनेक प्रश्न माझ्या मनात निर्माण होत होते. पण इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर मला कळलं की मी काय करू शकतो.”
‘माझ्यात हे करण्याची क्षमता आहे’
संजू सॅमसन पुढे म्हणाला, “जर मी क्रिजवर थोडा वेळ घालवला, तर माझ्याकडे फिरकी आणि वेगवान गोलंदाजांना शॉट मारण्याची क्षमता आहे. मला माहित आहे की मी संघासाठी नक्कीच चांगले योगदान देऊ शकतो. मी सामना जिंकवून देऊ शकतो. हेही एक वास्तव आहे. नक्कीच कारकीर्दीत बरेच चढ-उतार आले आहेत, परंतु वरची बाजू देखील खरोखर चांगली आहे. तेच मी स्वतःला सांगत राहिलो.” ३० वर्षीय खेळाडूची श्रीलंकेविरुद्ध कामगिरी चांगली राहिली नव्हती, पण त्याने बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात १११ धावा केल्या आणि त्यानंतर शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक झळकावले. वाईट काळात साथ दिल्याबद्दल केरळच्या फलंदाजाने कर्णधार सूर्यकुमार यादव आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचे आभार मानले.
‘खेळाडूची कारकीर्द उद्ध्वस्त होऊ शकते’ –
तो पुढे म्हणाला, “जेव्हा तुमच्याकडे सूर्यकुमार यादवसारखा कर्णधार असतो आणि गौतम भाई आणि व्हीव्हीएस लक्ष्मण सरांसारखे सहकारी असतात, तेव्हा ते सर्व अपयशाच्या वेळी तुम्हाला साथ देतात. तुमच्या अपयशात ते तुमच्याशी ज्या प्रकारे संवाद साधतात ते खूप महत्त्वाचे आहे. प्रत्येकाला माहित आहे की जर आपण नकारात्मक टप्प्यातून जात असू तर एखाद्या खेळाडूचे करिअर उद्ध्वस्त होऊ शकते. त्या काळात गौतम भाई आणि सूर्यकुमार यांनी माझ्याशी सतत संपर्क ठेवला. जेव्हा कर्णधार तुम्हाला सांगतो की तुम्ही शून्यावर आऊट झाल्यावर सराव कसा करावा, याचा अर्थ कर्णधाराचा तुमच्यावर विश्वास आहे. तुम्ही चांगली कामगिरी करावी अशी त्याची मनापासून इच्छा आहे. त्यामुळे मला वाटते की, या सर्व छोट्या गोष्टी खूप मोठी भूमिका बजावतात.”