Sanju Samson 300 Sixes in T20 Cricket : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना हरारे स्पोर्ट्स क्लब येथे पार पडला. या सामन्यात भारताने झिम्बाब्वेचा ४२ धावांनी पराभव मालिका ४-१ ने खिशात घातली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने संजू सॅमसनच्या अर्धशतकाच्या जोरावरवर ५ बाद १६७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात झिम्बाब्वे संघाला १२५ धावात करता आल्या. या सामन्यात संजू सॅमसनने अर्धशतकी खेळीच्या दरम्यान ११० मीटर लांब षटकारही ठोकला. या षटकारासह सॅमसनने टी-२० क्रिकेटमध्येही मोठी कामगिरी केली.

संजू सॅमसनने ठोकला ११० मीटरचा खणखणीत षटकार –

या सामन्यात संजू सॅमसनच्या बॅटमधून अर्धशतकी खेळी पाहायला मिळाली. टीम इंडियाच्या डावाच्या १२व्या षटकात त्याने एक उत्तुंग षटकार मारला. झिम्बाब्वेसाठी ब्रँडन मावुता हे षटक टाकत होता. ब्रँडन मावुताने षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर खणखणीत षटकार ठोकला. त्याने चेंडू थेट मैदानाबाहेर पाठवला, हा षटकार ११० मीटरचा होता, जो या मालिकेतील सर्वात लांब षटकार आहे. यापूर्वी याच डावात रियान परागने १०७ मीटरचा षटकार मारला होता.

टी-२० क्रिकेटमध्ये केली मोठी कामगिरी –

संजू सॅमसनसाठी हा षटकार खूप खास होता. या षटकारासह त्याने आपल्या टी-२० कारकिर्दीतील ३०० षटकारही पूर्ण केले. टी-२० क्रिकेटमध्ये ३०० षटकार मारणारा तो सातवा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने आपल्या टी-२० कारकिर्दीत आतापर्यंत ३०२ षटकार मारले आहेत. त्याचवेळी संजूने या सामन्यात अवघ्या ३९ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने ४५ चेंडूत एकूण ५८ धावा केल्या. यादरम्यान संजूच्या बॅटमधून एक चौकार आणि ४ षटकार दिसले. हे त्याचे टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील दुसरे अर्धशतक आहे.

हेही वाचा – IND vs ZIM 5th T20 : भारताने मोडला पाकिस्तानचा विश्वविक्रम! झिम्बाब्वेविरुद्ध केला ‘हा’ खास पराक्रम

भारताच्या गोलंदाजांनी दाखवली ताकद –

भारताची पहिली विकेट मुकेश कुमारने घेतली, ज्याने मधवेरेला खातेही उघडू दिले नाही. आपल्या स्पेलच्या दुसऱ्याच षटकात मुकेशने झिम्बाब्वेचा फलंदाज ब्रायन बेनेटलाही बाद केले. भारताकडून मुकेश कुमारने सर्वाधिक ४ बळी घेतले. शिवम दुबेने २ तर तुषार देशपांडे, वॉशिंग्टन सुंदर आणि अभिषेक शर्मा यांनी प्रत्येकी एक विकेट्स घेतली.

Story img Loader