कारकीर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये असणाऱ्या संजू सॅमसनने जोहान्सबर्ग इथे सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या टी२० लढतीत खणखणीत शतकी खेळी साकारली. पोतडीतल्या सगळ्या फटक्यांची मुक्त उधळण संजूच्या खेळीदरम्यान पाहायला मिळाली. पण याच खेळीदरम्यान संजूच्या षटकाराने एक चाहती जखमी झाल्याचं घटना समोर आली आहे.
१०व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर संजू सॅमसनने ट्रिस्टन स्टब्सच्या गोलंदाजीवर मिडविकेटच्या दिशेने जबरदस्त षटकार लगावला. संजूच्या बाहूतली ताकद या षटकारात उमटली. चेंडू प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका महिला चाहतीच्या चेहऱ्यावर जाऊन आदळला. हे लक्षात आल्यानंतर संजूने तात्काळ चाहतीच्या दिशेने सॉरीचा इशारा केला. मैदानातील अन्य प्रेक्षकांनी तिला सावरण्यासाठी मदत केली. संजूने मारलेला षटकार प्रेक्षकांमध्ये असलेल्या एका वस्तूवर आदळला आणि तिथून उसळी घेऊन चाहतीच्या चेहऱ्यावर जाऊन बसला. अचानक झालेल्या या अपघातामुळे चाहती रडू लागली.
या प्रकारामुळे संजूच्या एकाग्रतेवर जराही परिणाम झाला नाही. त्याची षटकार, चौकारांची मालिका सुरुच राहिली. संजूने गेल्या पाच डावातलं दुसरं शतक झळकावलं. संजूने ५६ चेंडूत ६ चौकार आणि ९ षटकारांसह नाबाद १०९ धावांची तडाखेबंद खेळी केली. संजूला तोडीस तोड खेळ करत तिलक वर्माने सलग दुसऱ्या सामन्यात शतकवीर होण्याचा मान पटकावला. त्याने ४७ चेंडूत ९ चौकार आणि १० षटकारांसह नाबाद १२० धावांची खेळी केली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ८६ चेंडूत २१० धावांची भागीदारी केली. या दोघांची विक्रमी शतकं आणि भागीदारीच्या बळावर भारतीय संघाने २८३ धावांचा डोंगर उभारला.