टीम इंडियातून बाहेर असलेला यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनचा संघात समावेश करण्याच्या अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत. संजू सॅमसनवर अन्याय होत असल्याबद्दल चाहते सतत आवाज उठवत आहेत. बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेतही संजू सॅमसनला संधी मिळाली नाही. दरम्यान संजू सॅमसनने रणजी ट्रॉफीमध्ये अप्रतिम खेळी करुन सर्वांचे लक्ष्य वेधले आहे.
रणजी ट्रॉफीमध्ये मंगळवारी केरळ आणि झारखंड यांच्यात सामना झाला, येथे केरळने प्रथम फलंदाजी केली. कर्णधार संजू सॅमसनने आपल्या संघाला संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. संजू सॅमसनने १०८ चेंडूत ७२ धावांची खेळी खेळली, ज्यात ४ चौकार आणि ७ षटकार लगावले.
संजू सॅमसनने आपल्या डावात १४ सिंगल्स काढल्या, तर बाकीच्या सर्व धावा चौकारावर केल्या. त्याने ८३ डॉट बॉल खेळले आणि यावेळी त्याचा स्ट्राइक रेट ६६.६७ होता. केरळकडून या डावात रोहन प्रेम (७९) आणि रोहन एस (५०) धावा केल्या.
संजू सॅमसन सतत आत-बाहेर होत आहे –
२८ वर्षीय संजू सॅमसन सतत टीम इंडियामध्ये आत बाहेर होत आहे. २०२१५ मध्ये टीम इंडियासाठी पदार्पण करणाऱ्या संजू सॅमसनने आतापर्यंत फक्त १६ टी-२०, ११ एकदिवसीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्याच्या नावावर ३३० एकदिवसीय, २९६ टी-२० धावा केल्या आहेत.
नुकत्याच झालेल्या बांगलादेश मालिकेत संजू सॅमसनला खेळण्याची संधी मिळाली नाही. संजू सॅमसनने गेल्या महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता, तर त्याने शेवटचा टी-२० सामना ऑगस्टमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला होता.
हेही वाचा – रहाणे, इशांतला वार्षिक करारातून डच्चू?; हार्दिक, सूर्यकुमार, गिलला बढती मिळण्याची शक्यता
ऋषभ पंत पांढऱ्या चेंडूच्या फॉर्मेटमध्ये खराब कामगिरी करताना दिसत आहे, त्यामुळे त्याच्या जागी संजू सॅमसनला एकदिवसीय संघात समाविष्ट करण्याची मागणी केली जात होती. जेणेकरून संजू सॅमसनला पुढील वर्षी एकदिवसीय विश्वचषक २०२३ साठी तयार करण्यात येत असलेल्या पूलमध्ये संधी मिळू शकेल.