Sanju Samson’s big revelation about Rohit Sharma : टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज संजू सॅमसनने आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ च्या फायनलबाबत मोठा खुलासा केला आहे. ज्या फायनलमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून दुसरा टी-२० विश्वचषक जिंकला. संजू सॅमसनला या स्पर्धेत एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही, पण त्याला थेट फायनल सामन्यात खेळवले जाणार होते. मात्र, नाणेफेकीच्या १० मिनिटे आधी कर्णधार रोहित शर्माने निर्णय बदलला आणि सॅमसनला खेळवले नाही. याबाबत आता स्वत: संजू सॅमसनने मोठा खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘मी नक्कीच थोडा निराश झालो होतो’ –

संजू सॅमसनने क्रीडा पत्रकार विमल कुमारला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “बार्बाडोसमध्ये झालेल्या फायनलमध्ये मला खेळण्याची संधी दिली जाणार होती. त्यामुले मला तयार राहण्यास सांगण्यात आले होते. मी तयारही होतो, पण नाणेफेकीपूर्वी मला सांगण्यात आले की आम्ही मागील प्लेइंग इलेव्हनसह खेळणार आहोत. हे ऐकून मी नक्कीच थोडा निराश झालो होतो. त्यावेळी वॉर्म अप चालू असताना रोहित भाई आले आणि मला बाजूला घेऊन गेले. ते असा निर्णय का घेत आहेत, हे समजावून सांगू लागले. ते म्हणाले संजू, तुला समजतय ना? तुम्हाला त्यांची शैली माहित आहे, ते अगदी सहज बोलतात.”

‘तू मला मनातल्या मनात खूप काही बोलत आहेस’ –

सॅमसन पुढे म्हणाला, “रोहित भाई मला म्हणाले अरे, तुला समजत आहे ना, मी काय करण्याचा प्रयत्न करत आहे. यावर मी म्हणालो, की नक्कीच समजू शकतो. त्यामुळे आपण अगोदर सामना खेळूया आणि यावर जिंकल्यानंतर बोलू. आधी आपण सामना जिंकू आणि नंतर बोलू. यावर रोहित भाई म्हणाले, नाही, नाही… मग ते पुढे गेले आणि पुन्हा माघारी आले. मला म्हणाले, नाही, तू मला मनातल्या मनात खूप काही बोलत आहेस, असं मला वाटत आहे. मला वाटतयं की तू आनंदी नाहीस. तुझ्या मनात काहीतरी आहे. मी म्हणालो, ‘नाही, नाही रोहित भाई, असं काही नाही. यानंतर आमच्यात पुन्हा संभाषण सुरू झाले. तेव्हा मी म्हणालो की, तुम्ही मला खेळाडू म्हणून विचाराल तर मला खेळायचेच आहे.”

हेही वाचा – Sarfaraz Khan : सर्फराझ खान झाला ‘अब्बा’जान! इन्स्टा स्टोरीवर फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी

‘मला कळले की हा माणूसच वेगळा’

यानंतर रोहित शर्माने सांगितले की तो काय विचार करत आहे. संजू सॅमसनने आपल्या मुलाखतीत पुढे सांगितले की, “रोहित भाईने सांगितले की त्यांचा पॅटर्न असा आहे. मी अशा प्रकारे काम करतो. तेव्हा मी म्हणालो की, माझ्या मनात तुमच्याबद्दल खूप आदर आहे. मला वाटते की, तुम्ही येऊन मला समजावून सांगितलं, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. पण मला नेहमी खंत वाटेल की, मी तुमच्या नेतृत्वाखाली फायनल खेळू शकलो नाही. मला त्यांची एक गोष्ट आवडली ती म्हणजे फायनल सारख्या मोठ्या सामन्याआधी, तुम्ही नाणेफेकीच्या आधी १० मिनिटे अशा व्यक्तीसोबत घालवत आहात, ज्याला तुम्ही खेळवणार नाही. तेव्हा मला कळले की हा माणूसच वेगळा आहे.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanju samson statement i was to play t20 world cup 2024 final but rohit sharma removed me xi 10 minutes before toss vbm
Show comments