पीटीआय, हैदराबाद

सर्वोच्च स्तरावर खेळताना अपयश येणार आणि अपेक्षांचे दडपणही असणार. त्यातून पळवाट काढणे शक्य नाही. मी आता या गोष्टी हाताळण्यास शिकलो आहे आणि याचा माझ्या कामगिरीवर सकारात्मक परिणाम झाला आहे, अशी प्रतिक्रिया भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज संजू सॅमसनने व्यक्त केली. तसेच अनेकदा अपयश येऊनही आपल्यावरील विश्वास कायम राखल्याबद्दल सॅमसनने संघ व्यवस्थापनाचेही आभार मानले.

भारतीय क्रिकेटमधील सर्वांत प्रतिभावान खेळाडूंमध्ये सॅमसनची गणना केली जाते. मात्र, कामगिरीत सातत्य राखता येत नसल्याने त्याच्यावर बरेचदा टीकाही होते. सॅमसनने आपल्या अलौकिक प्रतिभेचे पुन्हा दर्शन घडवताना शनिवारी झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात ४७ चेंडूंत ११ चौकार आणि ८ षटकारांच्या साहाय्याने १११ धावांची अप्रतिम खेळी केली. मात्र, यापूर्वीचे काही महिने त्याच्यासाठी विसरण्याजोगे ठरले होते. श्रीलंकेत सलग दोन ट्वेन्टी-२० सामन्यांत शून्यावर बाद झाल्यानंतर बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांत तो मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला होता. त्यानंतरही कर्णधार सूर्यकुमार यादव आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी त्याच्यावरील विश्वास कायम ठेवला.

हेही वाचा >>>Sanju Samson : संजूने इशानला मागे टाकत मोडला डी कॉकचा विक्रम, ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील पहिला खेळाडू

‘‘श्रीलंकेत दोन वेळा शून्यावर बाद झाल्यानंतर पुढील मालिकेत संधी मिळण्याबाबत मी साशंक होतो. मात्र, संघ व्यवस्थापनाने माझ्यावर विश्वास राखला आणि आम्ही तुला पाठिंबा देत राहू असे सांगितले. त्यामुळे माझाही आत्मविश्वास वाढला. भारतासाठी क्रिकेट खेळताना तुम्हाला मानसिकदृष्ट्या अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. परंतु, आता मी दडपण आणि अपयश हाताळण्यास शिकलो आहे. याचे श्रेय माझे सर्व सहकारी, कर्णधार आणि प्रशिक्षक यांना जाते,’’ असे सॅमसन म्हणाला.

तसेच बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत सलामीला संधी मिळणार असल्याचे संघ व्यवस्थापनाने आपल्याला तीन आठवडे आधीच सांगितले आणि त्यामुळे तयारीसाठी पुरेसा वेळ मिळाल्याचेही सॅमसनने नमूद केले.

‘‘मी राजस्थान रॉयल्सच्या अकादमीत जाऊन नव्या चेंडूविरुद्ध बराच सराव केला. त्याचा मला खूप फायदा झाला. अन्य मालिकेपेक्षा यावेळी १० टक्के अधिक तयारीनिशी मी आलो होतो,’’ असे सॅमसन म्हणाला.

एका सामन्यात अपयशी ठरल्यानंतर पुढील सामन्यात केवळ स्वत:चा आणि आपल्या धावांचा विचार मनात येणे सहज शक्य आहे. मात्र, मी अशाप्रकारचा व्यक्ती नाही. मी माझे सहकारी आणि संघाचा विचार करतो. यश असो वा अपयश, ते मला माझ्या पद्धतीने मिळवायचे आहे. मी आत्मकेंद्री नाही. माझ्यासाठी संघच महत्त्वाचा आहे. – संजू सॅमसन.