इंग्लंडविरूध्दच्या पाचव्या कसोटीतही भारतीय संघाची फलंदाजी बाजू चांगलीच फॉर्मात आहे. भारताचे वरिष्ठ खेळाडू संघात नसले तरी युवा खेळाडूंनी मात्र इंग्लिश संघाची दाणादाण उडवली आहे. या मालिकेत भारताकडून पदार्पण करणाऱ्या सर्फराझ खानने धरमशाला कसोटीतही आपल्या बॅटची चमक दाखवली आहे. सर्फराझने पाचव्या कसोटीत ६० चेंडूंमध्ये ८ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ५६ धावांची तुफान खेळी केली. या खेळीत त्याने मार्क वुडची चांगलीच शाळा घेतली.
सचिन स्पेशल शॉट
यादरम्यान, डावाच्या ७६व्या षटकात, सर्फराझ खान मार्क वुडच्या अंदाजे १५० किमी वेगाने येणाऱ्या चेंडूवर एक उत्कृष्ट शॉट खेळताना दिसला. या शॉटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. सरफराझने शॉर्ट पिच बॉलवर मागच्या बाजूला बसून थर्ड मॅनवर एक भन्नाट चौकार लगावला, या शॉटचं नाव रॅम्प शॉट आहे. सर्फराझ खानच्या या रॅम्प शॉटने चाहत्यांना सचिन तेंडुलकरच्या रॅम्प शॉटची आठवण करून दिली. तेंडुलकर अनेकदा वेगवान गोलंदाजांना असे फटके खेळताना दिसला आहे.
यानंतर पुढच्याच षटकात सर्फराझ खानने वुडच्या गोलंदाजीवर पुल शॉट खेळत मिड-विकेटवर उत्कृष्ट षटकार ठोकला. मार्क वुड मात्र त्याच्या या शॉटनंतर होणारी धुलाई पाहून चिडला. पहिल्या ७६व्या षटकात सर्फराझने त्याला दोन चौकार मारले. त्यानंतर पुढच्याच षटकात त्याने एक चौकार आणि एक षटकार ठोकला. मार्क वुड सर्फराझ खानला स्लेजिंग करताना दिसला, दोघांमध्येही शाब्दिक चकमक झाली. त्याचवेळी सर्फराझच्या शॉटचे फोटो आणि व्हिडिओही व्हायरल होऊ लागले. सर्फराझने या डावात ५५ चेंडूत अर्धशतक पूर्ण करत तिसरे अर्धशतक केले.
सर्फराझ खानने रांची कसोटीत १४ आणि ० धावा केल्या. पण धरमशाला कसोटीत मात्र त्याच्या बॅटने आपली कामगिरी चोख बजावली. राजकोट कसोटीत पदार्पण करताना सरफराजने नाबाद ६२ आणि ६८ धावांची खेळी खेळली. रोहित आणि गिल बाद झाल्यानंतर सर्फराझने देवदत्त पडिक्कलसोबत १०० अधिक धावांची भागीदारी केली.