भारतीय हॉकी संघाचा कर्णधार सरदारासिंग व ड्रॅगफ्लीकर व्ही.आर.रघुनाथ हे हॉकी इंडिया लीग स्पर्धेतील महागडे खेळाडू ठरले आहेत. येथे झालेल्या खेळाडूंच्या लिलावात त्यांना अनुक्रमे ४२ लाख ४९ हजार व ४१ लाख ४० हजार रुपयांची बोली मिळाली आहे.
स्पर्धेसाठी झालेल्या खेळाडूंच्या लिलावात सरदारासिंग याला दिल्ली फ्रँचाईजीने खरेदी केले. सहारा उत्तर प्रदेश संघाने रघुनाथ याला खरेदी केले. रघुनाथला घेण्यासाठी दिल्ली व उत्तर प्रदेश संघांमध्ये चुरस दिसून आली. अखेर दिल्लीने बाजी मारली. रघुनाथच्या तुलनेत भारताचा अव्वल दर्जाचा ड्रॅगफ्लिकर संदीपसिंग याला मात्र कमी भाव मिळाला. त्याला मुंबई फ्रँचाईजीने १५ लाख १३ हजार रुपयांच्या मानधनावर खरेदी केले. त्या तुलनेत रूपींदरपालसिंग या युवा खेळाडूला चांगला भाव मिळाला. त्याला दिल्ली संघाने ३० लाख ४८ हजार रुपयांच्या मानधनावर खरेदी केले.
नेदरलँड्सचा कर्णधार तिआन डीनुजीर याला सहारा उत्तर प्रदेश संघाने ६६ हजार डॉलर्सच्या मानधनावर खरेदी केले. जर्मनीचा कर्णधार मॉरिट्झ फुर्तुझ याला रांची ऱ्हिनोज संघाने ७५ हजार ५०० डॉलर्सच्या बोलीवर खरेदी केले. ऑस्ट्रेलियाचा अनुभवी खेळाडू जेमी डायर याला ६० हजार डॉलर्सचा भाव मिळाला. त्याला पंजाब वॉरियर्सने खरेदी केले. भारताचा सेंटर फॉरवर्ड खेळाडू एस.व्ही.सुनील याला दिल्ली संघाने २२ लाख ८६ हजार रुपयांची बोली लावून खरेदी केले.
प्रौढ खेळाडू इग्नेस तिर्की याला अनपेक्षित रीत्या चांगला भाव मिळाला. त्याला पंजाब संघाने १६ लाख ८७ हजार रुपयांची बोलींवर खरेदी केले. पाकिस्तानचा महंमद इरफान व स्पेनचा पॉल अमाट यांना खरेदी करणारे कोणीच भेटले नाही. एम.बी.अयप्पा या भारतीय खेळाडूला ११ लाख ४३ हजार रुपयांची बोली लाभली. भारतीय संघातील गुरुबाजसिंग व कोठाजितसिंग यांना अनुक्रमे १९ लाख ६० हजार व १७ लाख ४२ हजार रुपयांची बोली मिळाली. नवोदित खेळाडू अमित रोहिदास याला १५ लाख ७८ हजार रुपयांचे मानधन लाभले.
परदेशी खेळाडूंपैकी महंमद रशीद (पाकिस्तान) याला मुंबईने ४१ हजार डॉलर्स तर ऑस्ट्रेलियाचा मध्यरक्षक सिमोन ऑर्चर्ड याला ४५ हजार डॉलर्सचा भाव मिळाला. दिल्ली संघाने गुरविंदरसिंग चंडी याला २७ लाख २४ हजार रुपयांची बोली लावून खरेदी केले.
भारतीय हॉकीसाठी हा सुवर्णदिन म्हणावा लागले. क्रिकेटपटूंच्या तुलनेत आता हॉकीपटूंनाही चांगले दिवस आले आहेत. हॉकी इंडिया लीगमध्ये परदेशी खेळाडूंसह खेळण्याचा आणि ड्रेसिंगरूममध्ये त्यांचे अनुभव ऐकण्याचा निश्चितच फायदा होईल. दिल्ली संघासाठी माझी निवड झाली आहे. कुटुंबिय आणि घरच्या चाहत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल, यासाठी मुंबईतर्फे खेळण्याची माझी इच्छा होती. पण कोणत्याही संघातर्फे खेळताना मी माझी सर्वोत्तम कामगिरी करणार आहे. युवराज वाल्मिकी, हॉकीपटू.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा