भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार सरदार सिंग याचे चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघात पुनरागमन झाले आहे. या स्पर्धेसाठी आज भारतीय संघ जाहीर झाला. राष्ट्रकुल क्रीडास्पर्धांमध्ये सरदाराला संघातून वगळण्यात आले होते. त्या स्पर्धेत भारताने निराशाजनक कामगिरी केली होती. त्यामुळे सरदाराला पुन्हा संघात स्थान मिळणार हे जवळपास निश्चित होते. त्यातच बंगळुरू येथे झालेल्या राष्ट्रीय शिबिरातही त्याला सहभागी करून घेण्यात आल्यामुळे त्याच्या पुनरागमनाची शक्यता अधिक होती. अपेक्षेप्रमाणे त्याला संघात पुन्हा स्थान मिळाले आहे.

सरदार प्रमाणेच राष्ट्रकुल क्रीडास्पर्धांना मुकलेला वीरेंद्र लाक्रा याचेही संघात पुनरागमन झाले आहे. जरमनप्रीत सिंग, सुरेंद्र सिंग, रमणदीप सिंग यांनाही संघात स्थान देण्यात आले आहे. तर तंदुरूस्त नसल्याने रुपिंदर पाल आणि खराब कामगिरीमुळे कोठाजीत सिंग आणि गुरिंदर सिंग यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. ललित उपाध्याय आणि गुर्जन्त सिंग यांनाही संघात स्थान मिळवता आले नसून रमणदीप सिंगने बाजी मारली आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा नेदर्लंड्समधील ब्रेडा येथे २३ जूनपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेसाठी आज १८ जणांच्या संघाची घोषणा करण्यात आली असून पी आर श्रीजेश याच्याकडे संघाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. या संघात गोलकिपर सूरज करकेरा याच्या जागी कृष्ण बहादूर पाठकची वर्णी लागली आहे. गतवर्षी या स्पर्धेत भारताने रौप्यपदक मिळवले होते. यंदाच्या स्पर्धेत भारतीय संघ चांगली कामगिरी करेल, असा विश्वास कर्णधार श्रीजेशने व्यक्त केला आहे.

भारतीय संघ – श्रीजेश, कृष्ण बहादूर पाठक, हरमनप्रीत सिंग, वरुण कुमार, सुरेंद्र कुमार, जरमनप्रीत सिंग, वीरेंद्र लाक्रा, अमित रोहिदास, मनप्रीत सिंग, चिंग्लेसेन सिंग, सरदार सिंग, विवेक प्रसाद, सुनील विठ्ठलाचार्य, रमणदीप सिंग, मनदीप सिंग, सुमित कुमार (ज्युनिअर), आकाशदीप सिंग, दिलप्रीत सिंग.

Story img Loader