खेळाडूंच्या दुखापतींचे आव्हान सांभाळत मलेशियामधील इपोह येथे २४ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या आशिया चषक हॉकी स्पध्रेसाठी भारताच्या १८ सदस्यीय युवा संघाची घोषणा करण्यात आली. या महत्त्वाच्या स्पध्रेसाठी भारताचे नेतृत्व प्रेरणादायी सरदार सिंगकडे सोपविण्यात आले आहे.
दानिश मुज्ताबा, एस. व्ही. सुनील, गुरविंदरसिंग चंडी आणि आकाशदीप सिंग हे भारताचे चार अनुभवी खेळाडू दुखापतीच्या कारणास्तव खेळू शकणार नाहीत. त्यामुळे भारताची धुरा युवा आणि अननुभवी खेळाडूंवर प्रामुख्याने असेल. रमणदीप सिंग, नितीन थिमय्याह, मनदीप सिंग, मलक सिंग आणि निकिन थिमय्याहया पाच खेळाडूंवर भारताच्या आक्रमणाची मदार असेल.
ड्रॅगफ्लिकर व्ही. आर. रघुनाथऐवजी उपकर्णधारपदाची जबाबदारी गोलरक्षक पी. आर. श्रीजेशकडे सोपविण्यात आली आहे. बंगळुरूच्या साइ केंद्रात २५ ते २७ जुलैदरम्यान झालेल्या निवड चाचणीनंतर भारताचा संघ निश्चित करण्यात आला.
भारताचा संघ
गोलरक्षक : पी. आर. श्रीजेश (उपकर्णधार), पी. टी राव.
बचावपटू : व्ही. आर. रघुनाथ, रुपिंदरपाल सिंग, अमित रोहिदास, कोठाजित सिंग, बिरेंद्र लाक्रा, गुरमेल सिंग.
मध्यरक्षक : सरदार सिंग (कर्णधार), मनप्रीत सिंग, चिंग्लेनसाना सिंग, धरमविर सिंग, एस. के. उथप्पा.
आघाडीवीर : रमणदीप सिंग, नितीन थिमय्याह, मनदीप सिंग, मलक सिंग, निकिन थिमय्याह.

Story img Loader