Sarfaraz Khan Maiden Test Century IND vs NZ: भारत वि न्यूझीलंड बंगळुरू कसोटीत सर्फराझ खानने दणदणीत शतक झळकावले आहे. सर्फराझ खानने मोक्याच्या क्षणी शानदार फलंदाजी करत संघाचा डाव सावरत आपले पहिले कसोटी शतक पूर्ण केले. चौकारांची आतिषबाजी करत सर्फराझ खानने आपले हे शतक पूर्ण केले आहे. सर्फराझने ११२ चेंडूत १३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने १०२ धावा केल्या. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सर्फराझने विराट कोहलीबरोबर शतकी भागीदारी करून संघाला अडचणीतून बाहेर काढले. पहिले शतक झळकावल्यानंतर सर्फराझने बॅट उंचावत मैदानात धाव घेत या शतकाचा आनंद साजरा केला.

सर्फराझ खान गेल्या अनेक वर्षांपासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चमकदार कामगिरी करत होता, पण त्याला टीम इंडियामध्ये स्थान खेळण्याची संधी मिळत नव्हती. या वर्षी इंग्लंड संघाच्या भारत दौऱ्यात त्याला टीम इंडियासाठी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली आणि त्या या संधीचं सोन करत उत्कृष्ट कामगिरी केली. त्याने या सामन्यांमध्ये अर्धशतक केले होते. न्यूझीलंडविरुद्धची ही कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी सर्फराझ खान इराणी ट्रॉफी सामना खेळला होता, ज्यामध्ये त्याने आपल्या बॅटने द्विशतक झळकावले होते.

हेही वाचा – IND vs NZ: भारतीय संघाने घडवला इतिहास, १४७ वर्षांच्या कसोटी इतिहासात ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला संघ

सर्फराझ खानची कठीण प्रसंगी शतकी खेळी

सर्फराझ खान फलंदाजासाठी आला तेव्हा कर्णधार रोहित शर्मा बाद झाला होता आणि टीम इंडिया मोठ्या चिंतेत होती. पण सुरूवातीपासून सर्फराझने चांगले फटके खेळत आपला आक्रमक अंदाज दाखवून दिला. विराट कोहलीबरोबर शतकी भागीदारी केल्यानंतर तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत सर्फराझ ७० धावा करत मैदानात कायम होता. सर्फराझने चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतरही सकारात्मक पद्धतीने फलंदाजी सुरू ठेवली आणि वेगवान गतीने धावा काढण्यास सुरुवात केली आणि परिणामी त्याने ११० चेंडूत पहिले कसोटी शतक पूर्ण केले. सर्फराजच्या कसोटी कारकिर्दीतील हा केवळ चौथा सामना आहे. या शतकापूर्वी त्याने या वर्षी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान तीन अर्धशतकांच्या खेळीही खेळल्या होत्या.

हेही वाचा – Virat Kohli: किंग कोहलीची कसोटीमध्ये ‘विराट’ कामगिरी, तेंडुलकर-द्रविड यांच्यानंतर ‘ही’ कामगिरी करणारा ठरला चौथा भारतीय फलंदाज

शुबमन गिलच्या जागी संघात मिळाली संधी

बेंगळुरू कसोटी सामन्यात, मानेच्या दुखापतीमुळे शुबमन गिल सामन्यातून बाहेर झाला होता. त्यामुळे गिलच्या जागी सर्फराझ खानला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली. गिल संघात नसल्याने कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला तर सर्फराझला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळाली. यापूर्वी बांगलादेशविरुद्धच्या २ सामन्यांच्या कसोटी मालिकेदरम्यान सर्फराझला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. कसोटीत पहिल्या डावात शून्यावर बाद झाल्यानंतर दुसऱ्या डावात शतक झळकावणाऱ्या भारतीय संघातील खेळाडूंच्या यादीत आता सर्फराझ खानचा समावेश झाला आहे.

हेही वाचा – IND vs NZ: “कमीत कमी भारत ३६…”, टीम इंडिया ४६ वर ऑल आऊट झाल्यानंतर मायकेल वॉनने उडवली खिल्ली, भारतीय चाहत्यांनी ‘अशी’ केली बोलती बंद