Sarfaraz Khan reacts after being run out : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत पदार्पण केल्यापासून सरफराज खानचे नाव चर्चेत आहे. यामागे अनेक कारणे आहेत. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संधी मिळणे, वडिलांसोबतचा त्याचा फोटो आणि त्यानंतर पदार्पणाच्या सामन्यातच शानदार खेळी. पण या सगळ्यात त्याच्या धावबादची बरीच चर्चा होत आहे. रवींद्र जडेजाच्या चुकीमुळे सरफराज धावचीत झाला. याबद्दल चाहत्यांनी जडेजावर संताप व्यक्त केला. जडेजानेही याबद्दल माफी मागितली. आता या संपूर्ण प्रकरणावर सरफराजचीच प्रतिक्रिया समोर आली आहे.
या सामन्यात सरफराज खानने ६६ चेंडूत ६२ धावा केल्या. तो शानदार फलंदाजी करत होता आणि शतक झळकावेल असे वाटत होते. मात्र ६२ धावांवर जाडेजाच्या चुकीच्या कॉलवर त्याला मार्क वुडने धावचीत केले. यामुळे त्याला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. याबाबत सरफराज म्हणाला, “कधीकधी गैरसमज होतात आणि तो खेळाचा भाग आहे. कधी कधी तुम्ही धावबाद होतात आणि अशा गोष्टी घडत राहतात.”
“मी जरा घाबरलो होतो”
सरफराज खानने पुढे सांगितले की, संपूर्ण डावात जडेजाने त्याला खूप मदत केली. तो म्हणाला, “मी जरा घाबरलो होतो. दुपारच्या जेवणाच्या वेळी मी त्याच्याशी बोललो. मी अशा प्रकारचा फलंदाज आहे, ज्याला फलंदाजी करत असताना काय चालले आहे याबद्दल बोलायला आवडते. त्यामुळे जडेजाला सांगितले की, मी फलंदाजी करताना माझ्याशी बोलत राहा. त्याने मला खूप साथ दिली. “त्याने मला सांगितले की नवीन खेळाडूला कसे वाटते आणि तो नवीन असताना त्याला कसे वाटले होते.”
हेही वाचा – वडिलांसमोर भारतासाठी खेळण्याचे स्वप्न साकार झाल्याचा आनंद! भारताचा फलंदाज सर्फराज खानची प्रतिक्रिया
धावबाद कसा झाला?
सरफराजच्या धावबादबद्दल बोलायचे झाले, तर भारतीय डावातील ८२ वे षटक टाकले जात होते. जडेजा तेव्हा ९९ धावांवर खेळत होता. त्याने षटकातील पाचवा चेंडू थेट मिड-ऑनच्या दिशेने खेळला आणि धाव घेण्यास कॉल केला. त्यामुळे सरफराज धाव घेण्यासाठी धावला. पण अचानक जडेजाने धाव घेण्यास नकार दिला. त्यावेळी मिड-ऑनच्या दिशेने उभ्या असलेल्या वुडने अचूक थ्रो करुन सरफराजला धाववबाद केले. सरफराजने ६२ धावांच्या खेळीत नऊ चौकार आणि एक षटकार लगावला.
हेही वाचा – ट्वेन्टी-२० विश्वचषकापर्यंत द्रविडच भारताचा प्रशिक्षक ; ‘बीसीसीआय’चे सचिव जय शहा यांचे वक्तव्य
पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर जडेजाने आपली चूक मान्य केली. जडेजाने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. यात त्याने सरफराजला मेन्शन करत लिहिले, “मला सरफराजबद्दल वाईट वाटत आहे. तो माझा चुकीचा कॉल होता.” सामन्याबद्दल बोलायचे झाले, तर पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने ५ गडी गमावून ३२६ धावा केल्या होत्या. जडेजा ११० धावा करून आणि कुलदीप यादव १ धावा करून खेळत होता.