युवा फलंदाज सरफराज खानची भारतीय संघात निवड न झाल्याबद्दल माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी तिखट प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते की, “निवडकर्त्यांनी सरफराजच्या फिटनेसवर लक्ष केंद्रित न करता त्याच्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करून त्याची निवड करावी. यावर आता सरफराजने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने म्हटले आहे की तो स्वतः फिटनेसवर खूप लक्ष देतो आणि शक्य तितके फिट ठेवण्याचा प्रयत्न करतो.
खरे तर सरफराज खानची भारतीय संघात निवड झाली नसताना सुनील गावसकर यांनी तिखट प्रतिक्रिया दिली होती. इंडिया टुडेशी संवाद साधताना ते म्हणाले, “जर तुम्ही फक्त सडपातळ लोक शोधत असाल तर फॅशन शोमध्ये जा आणि मॉडेल घ्या आणि त्यांच्या हातात बॉल आणि बॅट द्या. क्रिकेट असे चालत नाही, तुमच्याकडे प्रत्येक शरीराच्या आकाराचे क्रिकेटर्स आहेत. कामगिरी पाहा, आकार नाही. शतक झळकावल्यानंतर सरफराज मैदानाबाहेर जात नाही. तो पुन्हा मैदानात येतो आणि तो तंदुरुस्त असल्याचे यावरूनच दिसून येते.”
मी तंदुरुस्त राहण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो – सरफराज खान
सरफराज खानने आता सुनील गावसकर यांच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. स्पोर्ट्स यारीवरील संभाषणादरम्यान तो म्हणाला, “हे विधान मला काही दिवसांपूर्वीच कळले. मी रणजी ट्रॉफी खेळण्यात व्यस्त होतो आणि त्यामुळेच मला आधी ओळखता आले नाही. मी म्हणेन की फिटनेस महत्त्वाचा आहे आणि मी माझ्याकडून सर्वोत्तम प्रयत्न करतो. आमचा शेवटचा रणजी सामना संपला तेव्हा मी रात्री २ वाजता घरी पोहोचलो आणि पहाटे ५ वाजता पुन्हा मैदानावर परतलो. रोज सकाळी ५ वाजता मी जातो त्यामुळे मैदानात माझा फिटनेस उत्तम आहे. माझ्या बाजूने जे शक्य आहे ते सर्व मी करतो.”
सरफराज खान दिल्ली कॅपिटल्ससाठी विकेटकीपिंग करणार?
असे मानले जाते की आयपीएल २०२३ मध्ये सर्फराज खान दिल्ली कॅपिटल्ससाठी विकेटकीपिंग करताना दिसणार आहे. वास्तविक, सरफराज खानचा विकेटकीपिंगचा सराव करतानाचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ऋषभ पंत आयपीएल २०२३चा भाग असणार नाही. यामुळे दिल्ली कॅपिटल्स यष्टिरक्षकाच्या शोधात आहे. मात्र, या फोटोनंतर चाहत्यांना विश्वास आहे की, सर्फराज खान आयपीएलच्या पुढील हंगामात दिल्ली कॅपिटल्ससाठी विकेटकीपिंग करताना दिसणार आहे.