Sarfraz Ahmed revealed about relationship between Babar and Masood : पाकिस्तान क्रिकेट संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेपूर्वी पाकिस्तान क्रिकेट संघाचा यष्टिरक्षक फलंदाज सरफराज अहमदने माजी कर्णधार बाबर आझम आणि नवा कर्णधार शान मसूद यांच्यातील नात्याबाबत मोठा खुलासा केला आहे. बाबर आझमने एकदिवसीय विश्वचषक २०२३ नंतर पाकिस्तान क्रिकेट संघाचे तिन्ही फॉरमॅटचे कर्णधारपद सोडले. त्यानंतर शान मसूदला कसोटी संघाचा कर्णधार नियुक्त करण्यात आले. आता बाबर आझम त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे.
तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी पाकिस्तान संघाला कॅनबेरा येथे चार दिवसीय सामन्यात पीएम इलेव्हनचा सामना करावा लागणार आहे. पाकिस्तान संघ यासाठी पूर्णपणे तयार आहे. या सामन्यानंतर पाकिस्तान संघ १४ डिसेंबरपासून पर्थमध्ये पहिला कसोटी सामना खेळणार आहे. त्यानंतर मेलबर्नमध्ये बॉक्सिंग डे कसोटी सामना होणार आहे. तसेच सिडनीमध्ये नवीन वर्षात तिसरा कसोटी खेळला जाणार आहे. पीएम इलेव्हनविरुद्धच्या सामन्यापूर्वी बोलताना सर्फराज अहमद म्हणाला की, पाकिस्तान संघ या सामन्यासाठी पूर्णपणे तयार आहे.
पाकिस्तानने ऑस्ट्रेलियन भूमीवर कधीही कसोटी मालिका जिंकलेली नाही आणि १३ वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे. सरफराज म्हणाला “ऑस्ट्रेलियाकडे चांगले फलंदाज आहेत, पण आम्हीही कमी नाही. अब्दुल्ला, बाबर, इमाम, सौद आणि आगा यांच्यासह आम्ही आव्हानासाठी सज्ज आहोत. शाहीन आणि हसन हे सुद्धा आहेत. तसेच आमच्याकडे मीर हमजा, खुर्रम शहजाद आणि फहीमसारखे खेळाडू आहेत ज्यांनी देशांतर्गत स्पर्धांमध्ये आपली योग्यता सिद्ध केली आहे.”
बाबर आझम आणि शान मसूद यांच्यातील संबंध –
“आपल्या देशाचे नेतृत्व करणे हा नेहमीच सन्मान असतो आणि मी शान मसूदचे त्याच्या भूमिकेबद्दल अभिनंदन करू इच्छितो. बाबर आझम, मुहम्मद हाफीज आणि शान मसूद यांच्यातील चांगले संबंध आमच्या शिबिरातील मजबूत बंधाचा पुरावा आहे. तसेच संघाच्या यशात योगदान देण्यासाठी कोणतीही भूमिका बजावण्यात मला आनंद वाटतो, मग ते फलंदाज म्हणून असो की यष्टिरक्षक.