आशियाई क्रीडा स्पर्धेदरम्यान पदक नाकारल्याबद्दल तात्पुरत्या निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागणारी भारताची महिला बॉक्सर हिने आपल्यावरील निलंबन मागे घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनला (एआयबीए) विनवणी केली आहे. आपल्या कृत्याचा आपल्याला पश्चात्ताप झाला असून यापुढे पुन्हा असे कृत्य करणार नाही, असे माफी मागणारे पत्र तिने एआयबीएला पाठवले आहे.
इन्चॉन येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत उपांत्य फेरीत वादग्रस्त पद्धतीने पराभूत व्हावे लागल्यानंतर सरिताने पदक वितरण सोहळ्यादरम्यान पदक स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे सरितावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून तिचा पुढील महिन्यात होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील सहभाग अनिश्चित झाला आहे.
एआयबीएच्या नोटिशीला उत्तर देताना सरिता म्हणाली, ‘‘पदक वितरण सोहळ्यादरम्यान जे काही घडले, त्याला सर्वस्वी मीच जबाबदार आहे. माझ्या चुकांची जाणीव झाल्यानंतर मी लगेचच आशियाई ऑलिम्पिक समिती आणि आशियाई स्पर्धेच्या संयोजन समितीला माफी मागणारे पत्र पाठवले होते. यापुढे माझ्याकडून असे कृत्य घडणार नाही, याची खात्री देते. आशियाई स्पर्धेआधीची माझी कामगिरी लक्षात घेऊन माझ्यावरील कारवाई मागे घेण्यात यावी, अशी विनंती करते. गेल्या १४ वर्षांच्या कारकीर्दीत मी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणतेही बेशिस्त वर्तन केलेले नाही.’’
‘‘पदक स्वीकारतानाचे माझे कृत्य पूर्वनियोजित नव्हते. असे काही घडणार आहे, याची कल्पना माझे प्रशिक्षक किंवा पतीला नव्हती. निराशेमुळेच माझ्याकडून असे कृत्य घडले, पण त्याचा मला खेद होत असून मी मनापासून माफी मागते. एआयबीएने यापुढेही खेळण्याची संधी मला द्यावी, अशी विनंती करते.’’
एआयबीएने सौम्य धोरण स्वीकारावे – बॉक्सिंग इंडिया
नवी दिल्ली : सरिता देवीवरील निलंबन मागे घेण्याची मागणी बॉक्सिंग इंडियाने केली असून तिने मागितलेली बिनशर्त माफी आणि तिची आतापर्यंतची कामगिरी याचा विचार करून एआयबीएने सौम्य धोरण स्वीकारावे, असे पत्र बॉक्सिंग इंडियाचे अध्यक्ष संदीप जजोडिया यांनी आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनला (एआयबीए) लिहिले आहे. एआयबीएच्या या कठोर भूमिकेवर चर्चा करण्यासाठी क्रीडा मंत्रालय आणि भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन यांच्यात सोमवारी चर्चा झाली. या बैठकीला उपस्थित असलेले जजोडिया म्हणाले, ‘‘सरिताची त्या वेळची प्रतिक्रिया पूर्वनियोजित नव्हे, तर उत्स्फूर्त होती. तिने त्याबद्दल बिनशर्त माफीही मागितली आहे. सरिता ही वरिष्ठ बॉक्सर असून तिने याआधी कोणतेही बेशिस्त वर्तन केलेले नाही.’’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा