आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक प्रदान सोहळ्यात माझ्यावर अन्याय झाला. पदक प्रदान सोहळ्यातील वर्तनासाठी मी माफी मागितली आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचे दक्षिण कोरिया आणखी चांगल्या पद्धतीने नियोजन करेल अशी आशा बॉक्सिंगपटू सरिता देवीने व्यक्त केली.
उपांत्य फेरीच्या लढतीत दक्षिण कोरियाच्या जीना पार्कविरुद्ध वर्चस्व गाजवल्यानंतरही सरिताला पराभवाला सामोरे जावे लागले. या निर्णयाविरोधात सरिताने अपील केले. मात्र तेही फेटाळण्यात आले. त्यानंतर सरिताने पदक प्रदान सोहळ्यात कांस्यपदक स्वीकारण्यास नकार दिला. थोडय़ाच वेळात तिने हे कांस्यपदक रौप्यपदक विजेत्या दक्षिण कोरियाच्या खेळाडूच्या गळ्यात घातले.
ती म्हणाली, ‘या प्रकरणाने मानसिकदृष्टय़ा मी थकले आहे. १३ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेदरम्यान परीक्षण चांगले होईल अशी अपेक्षा आहे. माझ्या अपीलमुळे परीक्षणात सकारात्मक बदल होईल अशी अपेक्षा आहे.’’ ती पुढे म्हणाली, ‘‘माझ्यामुळे अन्य बॉक्िंसगपटूंना अनिष्ट परिणामांना सामोरे जायला नको, यासाठी मी माफी मागितली. मी देशासाठी लढले. अन्य बॉक्सिंगपटूंना अशा प्रकाराला सामोरे जायला नको म्हणून मी लढा दिला. पदक प्रदान सोहळ्यात मी माझ्या भावनांना आवर घालू शकले नाही.’’
सरिताने बिनशर्त माफी मागितली
निलंबनाची टांगती तलवार डोक्यावर असलेली भारताची महिला बॉक्सर एल. सरिता देवीने आपल्या कृत्याबद्दल बिनशर्त माफी मागितली असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने (एआयबीए) पत्रकाद्वारे दिली आहे.
‘‘भारतीय पथकाचे प्रमुख आदिल सुमारीवाला यांनी सरिता देवीने मागितलेला बिनशर्त माफीनामा महासंघाचे अध्यक्ष डॉ. चिंग-कुओ वू यांना पाठवला आहे. पदक वितरण सोहळ्यामध्ये भावनेच्या भरात येऊन आपण असे कृत्य केल्याचे तिने म्हटले असून या कृत्याचा पश्चात्ताप झाल्याचेही तिने लिहिले आहे, असे महासंघाच्या पत्रकामध्ये म्हटले आहे.
६० किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात दक्षिण कोरियाच्या जिना पार्कला विजयी घोषित केल्यावर सरिता देवीने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर पदक वितरण सोहळ्यामध्ये तिने कांस्यपदक पार्कच्या गळ्यात घातले होते.
सरिताने केलेले कृत्य पूर्वनियोजित होते. तिने जे कृत्य केले ते अशोभनीय असून हे पाहणे दुर्दैवी होते, असे मत महासंघाने व्यक्त केले होते. पण महासंघाच्या मताशी भारतीय पथकाचे प्रमुख सुमारीवाला हे सहमत नसून हे कृत्य पूर्वनियोजित नसल्याचे त्यांनी सांगितले.
हे प्रकरण आयओएने मिटवावे -बॉक्सिंग इंडिया
आशियाई स्पर्धेतील महिला बॉक्सर सरिता देवीचे प्रकरण चांगलेच गाजत असून, हे प्रकरण भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने (आयओए) आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाशी (एआयबीए) चर्चा करून मिटवावे, अशी मागणी नवनिर्वाचित बॉक्सिंग इंडियाचे अध्यक्ष संदीप जडोडिया यांनी केली पत्रकात केली आहे. ते म्हणाले, ‘‘सरिता देवी प्रकरणाने आम्ही सारेच खिन्न झालो आहोत. हे प्रकरण आयओएने ‘एआयबीए’शी चर्चा करून सोडवावे. आम्हाला अशी आशा आहे की, या दोन्ही संघटनांनी चर्चा केल्यास हे प्रकरण मिटू शकेल.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा