आशियाई क्रीडा स्पर्धेत पंचांच्या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त करत पदक वितरण सोहळ्यादरम्यान कांस्यपदक स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे भारताची महिला बॉक्सर सरिता देवी हिला कठोर शिक्षेला सामोरे जावे लागेल, असे संकेत आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनने (एआयबीए) दिले आहेत.
पारितोषिक वितरण सोहळ्यादरम्यान निषेध व्यक्त करणाऱ्या सरितासह भारताच्या तीन प्रशिक्षकांवर अनिश्चित कालावधीसाठी एआयबीएने तात्पुरती बंदी आणली आहे. ‘‘एआयबीएच्या शिस्तपालन आयोगासमोर हे प्रकरण प्रलंबित असून दक्षिण कोरियामध्ये होणाऱ्या जागतिक महिला बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेआधी याविषयी तोडगा निघण्याची अपेक्षा आहे. मात्र सरितावर कडक कारवाई करण्यात येईल, हे नक्की. कोणत्याही खेळाडूकडून गैरकृत्य खपवून घेतले जाणार नाही. जर विजेता झाल्याचा निकाल स्वीकारत असाल तर पराभवही पचवता आला पाहिजे. प्रत्येकाने अशाप्रकारे निषेध नोंदवला तर स्पर्धेतील रंगत निघून जाईल,’’ असा इशारा एआयबीएचे अध्यक्ष सीके वू यांनी दिला आहे.
दक्षिण कोरियाच्या जीना पार्क हिच्याविरुद्ध उपांत्य फेरीत पराभूत व्हावे लागल्यानंतर सरिताने कांस्यपदक न स्वीकारता ते पार्क हिला बहाल केले होते. तात्पुरत्या बंदीची कारवाई ओढवल्यानंतर सरिताने एआयबीएची बिनशर्त माफी मागितली होती. ‘कारणे दाखवा’ नोटिशीला उत्तर देतानाही तिने यापुढे आपण असे कृत्य करणार नाही, असे माफी मागणारे पत्र एआयबीएला पाठवले होते.
सरितावरील बंदी उठवण्यात यावी, अशी विनंती बॉक्सिंग इंडियाचे अध्यक्ष संदीप जजोडिया यांनी एआयबीएला केली होती. ‘‘सरिता देवीची प्रतिक्रिया पूर्वनियोजित नव्हे तर उत्स्फूर्त होती. कोणत्याही खेळाडूने गैरकृत्य करू नये, असे आम्हालाही वाटते, पण तिने बिनशर्त माफी मागितली असून सरिताची गतकामगिरीही लक्षात घ्यायला हवी,’’ असे जजोडिया यांनी एआयबीएला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा