पोलंडमधील ग्लिविसे येथे चालू असलेल्या सिलेसियान बॉक्सिंग स्पध्रेच्या ६० किलो गटात माजी विश्वविजेत्या एल. सरिता देवीने कांस्यपदक पटकावले.
दोनदा आशियाई विजेत्या आणि एकदा आशियाई क्रीडा स्पध्रेत कांस्यपदक पटकावणाऱ्या सरिताला कझाकस्तानच्या करिना इब्रागिमोव्हाने ५-० असे पराभूत केले. मात्र या सामन्याच्या निकालाबाबत भारतीय चमूने नाराजी प्रकट केली.
‘‘सरिता या सामन्यात विजयी असल्याचे स्पष्ट दिसत होते. मात्र पंचांनी प्रतिस्पर्धी खेळाडूच्या बाजून कौल दिला. प्रेक्षकांनीही निकालानंतर आपली नाराजी प्रकट केली. त्यामुळे हा निकाल वादग्रस्त आहे,’’ अशी प्रतिक्रिया संघाच्या प्रशिक्षकांनी प्रकट केली.
कनिष्ठ गटात १३ पदकांची कमाई
कनिष्ठ गटात भारतीय खेळाडूंनी वर्चस्वपूर्ण कामगिरी साकारताना सहा सुवर्ण, सहा रौप्य आणि एका कांस्यपदकासह एकूण १३ पदकांची कमाई केली. भारती (४६ किलो), टिंगमिला डाँगेल (४८ किलो), संदीप कौर (५२ किलो), नेहा (५४ किलो), अर्शी खानम (५७ किलो) आणि कोमल (८० किलो) यांनी सुवर्णपदक पटकावले. अमिशा भारती (५० किलो), सान्या नेगी (६० किलो), दिनेश नाईक (६३ किलो), संजय गुनेले (६६ किलो), राज साहिबा (७० किलो) आणि लिपाक्षी (८० किलोवरील) यांनी रौप्यपदक मिळवले. तसेच नेहाने (७५ किलो) कांस्यपदक पटकावले.
एम. सी. मेरी कोम (४८ किलो) आणि मनीषा (५४ किलो) यांचे अंतिम सामने व्हायचे आहेत. माजी युवा विश्वविजेती खेळाडू ज्योती गुलिया (५१ किलो) हीसुद्धा युवा गटाच्या अंतिम सामन्यात खेळणार आहे.