भारताच्या महिला बॉक्सर्सना जागतिक महिला बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकांचे खाते खोलता आले नाही. सर्जूबाला (४८ किलो) आणि स्विटी (८१ किलो) यांना अंतिम फेरीत पराभूत व्हावे लागल्यामुळे रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
सर्जूबाला हिला कझाकस्तानच्या नझिम कायझाबाय हिच्याकडून पराभव पत्करावा लागला. सूर्जबालाने पहिल्या फेरीत आक्रमक सुरुवात करत कायझाबायला पंचेस लगावले. पण दुसऱ्या फेरीत कायझाबायने पुनरागमन करत तिच्या आक्रमणाला चोख प्रत्युत्तर दिले. दुसऱ्या फेरीवर वर्चस्व गाजवून कायझाबायने बरोबरी साधली. तिसऱ्या फेरीत सर्जूबालाने अनुभव पणाला लावत सुरेख खेळ केला. पण तिला योग्य दिशेने पंचेस लगावता आले नाहीत. मात्र कायझाबायने उंचीचा फायदा उठवत आणि चपळ खेळ करत तिला पंचेस लगावले. निर्णायक चौथ्या फेरीत पंचेस लगावण्यासाठी कुणीही पुढाकार घेत नव्हते. अखेर सर्जूबाला हिला पंचांनी ताकद दिली. त्यामुळे पंचांनी कायझाबायला एकमताने विजयी घोषित केले.
सुवर्णपदकाच्या लढतीत स्विटीला चीनच्या यँग झायोली हिने हरवले. आपल्यापेक्षा उंच असलेल्या यँगवर वर्चस्व गाजवण्याचा स्विटीचा प्रयत्न पहिल्या फेरीत फोल ठरला. यँगने एक पाऊल मागे येत स्विटीला अनेक वेळा जॅब्सचे फटके लगावले. पायाची हालचाल नीट होत नसल्याने स्विटीला पंचेस लगावण्यात अडचणी येत होत्या. यँगने चारही फेऱ्यांमध्ये सुरेख खेळ करत सुवर्णपदकावर कब्जा केला.

Story img Loader