रवींद्र जडेजाशी झालेल्या वादाप्रकरणी जेम्स अँडरसन निर्दोष असल्याचा निर्वाळा देणाऱ्या न्यायआयुक्तांच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, ही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) याचिका आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) फेटाळली आहे. न्यायआयुक्तांनी दिलेल्या निर्णयाबाबत आम्ही समाधानी आहोत, असे मत आयसीसीने व्यक्त केल्यामुळे भारताला आणखी एक धक्का बसला आहे.
अँडरसनला निर्दोष ठरवल्यामुळे नाराज झालेल्या बीसीसीआयने आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह रिचर्डसन यांच्याकडे न्यायआयुक्त गॉर्डन लुइस यांच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी याचिका दाखल केली होती. ट्रेंट ब्रिजच्या पहिल्या कसोटीत आयसीसीच्या आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका अँडरसन आणि रवींद्र जडेजावर ठेवण्यात आला होता. परंतु लुइस यांनी दोन्ही खेळाडू दोषी नसल्याचे स्पष्ट केले होते.
आयसीसीने आपल्या पत्रकात म्हटले आहे की, ‘‘अँडरसन आणि जडेजा यांनी आयसीसीच्या आचारसंहितेचा भंग केला नसल्यामुळे ते निर्दोष असल्याचे स्पष्ट करणारा लुइस यांच्या निर्णयाचा लिखित अहवाल आमच्याकडे आहे. यासंदर्भात शुक्रवारी साऊदम्पटनला विस्तृत सुनावणी झाली होती. या निर्णयाबाबत आम्ही समाधानी आहोत.’’

Story img Loader