कसोटी कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावल्याच्या आनंदापेक्षाही संघाचा पराभव टाळण्यात खारीचा वाटा उचलल्याचे समाधान अधिक महत्त्वाचे आहे, असे भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू स्टुअर्ट बिन्नीने सांगितले.
बिन्नीने पदार्पण करताना इंग्लंडविरुद्ध ट्रेंट ब्रिज येथील कसोटीत दुसऱ्या डावात ७८ धावांची झुंजार खेळी करीत भारताला पराभवापासून परावृत्त केले होते. तो म्हणाला, ‘‘पहिल्या डावात अपयशी ठरल्यानंतर मी खूप निराश झालो होतो. त्यामुळेच दुसऱ्या डावात चांगली फलंदाजी करीत आपली निवड सार्थ ठरविली पाहिजे, असे मी मनाशी ठरविले होते. मी दुसऱ्या डावात खेळावयास आलो, त्या वेळी संघ पराभवाच्या छायेत सापडला होता. माझ्यावर मोठी जबाबदारी होती. त्या दृष्टीनेच मी आत्मविश्वासाने व सकारात्मक वृत्तीने खेळलो. येथील खेळपट्टी खूप टणक होती व त्यावर चेंडू जास्त वरती येत नव्हता. इंग्लंडच्या खेळाडूंनाही या खेळपट्टीबद्दल आश्चर्य वाटले.’’

गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली -धोनी
नॉटिंगहॅम : खेळपट्टीवर आमचे नियंत्रण नसते. खेळपट्टीपासून गोलंदाजांना फारशी मदत मिळणार नव्हती, तरीही आमच्या गोलंदाजांनी अतिशय चांगली कामगिरी केली. या खेळपट्टीवर १६० षटके टाकणे ही काही सोपी गोष्ट नाही. त्यांनी दमछाक होण्याची जाणीव न देता अथक गोलंदाजी केली याचेच मला कौतुक वाटते, असे भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने सांगितले.
‘‘मुरली विजयसह सर्वच युवा फलंदाजांनी सकारात्मक वृत्तीने खेळ केला,’’ असेही त्याने सांगितले.

खेळपट्टी भारतासाठीच अनुकूल होती –  कुक
नॉटिंगहॅम : खेळपट्टी आमच्यापेक्षा भारतीय संघासाठी अतिशय पूरक होती त्यामुळेच हा सामना निकाली होऊ शकला नाही, असे मत इंग्लंडचा कर्णधार अ‍ॅलिस्टर कुकने व्यक्त केले.
तो पुढे म्हणाला, वेगवान गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टी असेल अशी आमची अपेक्षा होती, मात्र आमच्या अंदाजापेक्षा खेळपट्टी खूपच वेगळी होती. आम्हाला या खेळपट्टीचा फारसा अभ्यास करता आला नाही.  खेळपट्टी तयार करणे ही काही सोपी गोष्ट नाही.’’