पीटीआय, येओसू (कोरिया) : बॅडमिंटनविश्वातील आपला दबदबा कायम राखताना भारताच्या सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीने रविवारी यंदाच्या हंगामातील चौथे विजेतेपद मिळवले. सात्त्विक-चिराग जोडीने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असणाऱ्या फजर अल्फिआन आणि मोहम्मद रियान आर्डिआन्तो या मलेशियन जोडीचा १७-२१, २१-१३, २१-१४ असा पराभव करत कोरिया खुली स्पर्धा (सुपर ५०० दर्जा) जिंकली.
सात्त्विक-चिरागने यंदा कामगिरीत कमालीचे सातत्य राखले. यंदाच्या हंगामात त्यांनी सलग १० सामने जिंकण्याची कामगिरी करून दाखवली आहे. त्याचबरोबर स्वीस, आशियाई अजिंक्यपद आणि इंडोनेशिया खुल्या स्पर्धेच्या विजेतेपदानंतर आता कोरिया खुल्या स्पर्धेच्या जेतेपदावरही मोहोर उमटवली.
अंतिम लढतीतील पहिल्या गेममध्ये भारतीय जोडीची सुरुवात निराशाजनक होती. या गेममध्ये भारतीय जोडीला पिछाडी भरून काढण्यात शेवटपर्यंत अपयश आले. दुसऱ्या गेममध्ये मात्र भारतीय जोडीला लय गवसली. या गेममध्ये सुरुवातीला ४-२ अशी मिळवलेली आघाडी भारतीय जोडीने अखेपर्यंत राखली. चिरागचा कोर्टवरील चौफेर खेळ आणि सात्त्विकचे जोरकस व ताकदवान फटके परतवण्यात जागतिक स्पर्धेतील दोन वेळच्या कांस्यपदक विजेत्या फजर-रियान जोडीला अपयश आले. भारतीय जोडीने १९-११ अशी निर्णायक आघाडी मिळविल्यावर प्रतिस्पर्धी जोडीकडून रॅलिजचा सुरेख खेळ बघायला मिळाला. मात्र, इंडोनेशियन जोडीचे फटके नेटमध्ये अडकले आणि भारतीय जोडीने गेम जिंकत सामन्यात बरोबरी साधली.
तिसऱ्या गेममध्येही काही सुंदर रॅलिज बघायला मिळाल्या. यातही भारतीय जोडीच्या खेळात कमालीचा वेग दिसून आला. याच पद्धतीने खेळ करत भारतीय जोडी ९-६, ११-८, १३-१०, १८-१२ अशी आघाडी टिकवून होती. या मोठय़ा आघाडीनंतर भारतीय जोडीने पकड भक्कम करत गेम सात गुणांनी जिंकत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
सात्त्विक-चिरागचा दबदबा
दुहेरीत आपला ठसा ठसठशीत उमटविणाऱ्या सात्त्विक-चिराग जोडीने राष्ट्रकुल विजेतेपद, थॉमस करंडक विजेतेपद, जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक, सय्यद मोदी, स्वीस खुल्या स्पर्धेतील विजेतेपद, थायलंड, भारत खुल्या स्पर्धेत विजेते, फ्रेंच आणि इंडोनेशिया स्पर्धेतही अजिंक्य अशी विजेतेपदाची मालिका राखली आहे.
हा आठवडा आमच्यासाठी चांगला राहिला. हेच सातत्य आम्हाला आता पुढील आठवडय़ात जपानमध्ये राखायचे आहे. थोडीशी विश्रांती घेऊ आणि लगेच जपानमध्ये होणाऱ्या स्पर्धेवर लक्ष्य केंद्रित करू. या विजेतेपदामुळे आमचा आत्मविश्वास दुणावला आहे. – सात्विकसाईराज रंकीरेड्डी
अंतिम फेरीत आमच्याकडून चांगली सुरुवात झाली नाही. मात्र, दुसऱ्या गेममध्ये आम्हाला लय सापडली. हा गेम जिंकल्यामुळे आमचा आत्मविश्वास उंचावला आणि तीच लय अखेपर्यंत राखत विजेतेपदावर मोहोर उमटवली. इंडोनेशिया स्पर्धेनंतर लगोलग कोरियात विजेतेपद मिळवल्याने खूप आनंद झाला आहे. – चिराग शेट्टी