जकार्ता : भारताच्या सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या तारांकित जोडीने इंडोनेशियाच्या फजर अल्फियान आणि मोहम्मद रिआन आर्डिआंतो या अग्रमानांकित जोडीला पराभवाचा धक्का देत इंडोनेशिया खुल्या बॅडिमटन स्पर्धेतील (सुपर १००० दर्जा) पुरुष दुहेरीची उपांत्य फेरी गाठली. पुरुष एकेरीत एचएस प्रणॉयनेही लय कायम राखत अंतिम चार खेळाडूंमध्ये स्थान मिळवले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सातव्या मानांकित सात्त्विक-चिराग जोडीने इंडोनेशियाच्या जोडीविरुद्ध उत्कृष्ट खेळ केला. भारतीय जोडीने ४१ मिनिटे चाललेल्या सामन्यात २१-१३, २१-१३ असा विजय नोंदवला. सात्त्विक-चिराग जोडीने सामन्याच्या सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला. त्यांच्या अचूक खेळाचे इंडोनेशियाच्या जोडीकडे उत्तर नव्हते. आता सात्त्विक-चिरागची कोरियाच्या कान्ग मिन ुक आणि सेव सेउंग जाये या जोडीशी गाठ पडेल.

पुरुष एकेरीच्या सामन्यात प्रणॉयनेही धक्कादायक निकाल नोंदवताना जपानच्या तिसऱ्या मानांकित कोडाई नाराओकावर २१-१८, २१-१६ असा विजय साकारला. उपांत्य फेरीत त्याचा सामना अग्रमानांकित व्हिक्टर अ‍ॅक्सेलसेनशी होईल. सामन्यातील पहिल्या गेममध्ये नाराओकाने प्रणॉयसमोर आव्हान उपस्थित केले. मात्र, मोक्याच्या क्षणी प्रणॉयने खेळ उंचावत विजय साकारला. दुसरा गेमही काही काळ चुरशीचा झाला. मात्र, अनुभवी प्रणॉयने संयम राखताना अखेरीस झटपट गुण मिळवत विजय संपादला.

श्रीकांतचे आव्हान संपुष्टात किदम्बी श्रीकांतला इंडोनेशिया स्पर्धेतील उपांत्यपूर्व सामन्यात चीनच्या ली शी फेंगकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्याचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. श्रीकांतने एक तास आणि नऊ मिनिटे चाललेल्या सामन्यात जागतिक क्रमवारीत १०व्या स्थानी असलेल्या फेंगकडून १४-२१, २१-१४, १२-२१ अशी हार पत्करली. या दोन बिगरमानांकित खेळाडूंमधील सामन्यात श्रीकांतला चुकांचा फटका बसला. फेंगच्या डावा पायाला दुखापतही झाली होती, पण याचा त्याच्या खेळावर परिणाम झाला नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Satwik chirag hs prannoy enter indonesia open semifinals zws
Show comments