रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा

पहिल्या दिवसाच्या खेळात केवळ तीन गडी बाद, तर दुसऱ्या दिवशी १० गडी बाद. पहिल्या डावात ३९८ धावांपर्यंत मजल मारल्यानंतर महाराष्ट्राची तीन बाद ८६ अशी अवस्था करून सौराष्ट्राने रणजी करंडक क्रिकेट सामन्यावर दुसऱ्याच दिवशी पकड मिळवली आहे. अद्याप ३१२ धावांनी पिछाडीवर असलेल्या महाराष्ट्राला पहिल्या डावात आघाडी घेणे आता बिकट झाले आहे.

दुसऱ्या दिवशीचा खेळ तीन बाद २६९ वरून पुढे सुरू करणाऱ्या सौराष्ट्राला समद फलाहने पहिला धक्का दिला. कालच्या वैयक्तिक धावसंख्येत आठ धावांची भर घालून जॅक्सन (२०) तंबूत परतला. त्यानंतर अनुपम संकलेचाने प्रेरक मंकडला पायचित करून शून्यावर परत पाठविले. वासवदाने कमलेश मकवानाच्या साथीने किल्ला लढवत  सहाव्या गडय़ासाठी ८८ धावांची भागीदारी करीत संघाला पाच बाद २८२ वरून ३७० पर्यंत नेले.  संकलेचाने वासवदाला पायचित करून ६२ धावांची त्याची खेळी संपविली. त्यानंतर अन्य फलंदाज झटपट तंबूत परतले. संपूर्ण डाव ३९८ धावसंख्येत आटोपला. संकलेचाने १०३ धावांमध्ये सहा गडी बाद केले.  महाराष्ट्राचा सलामीवीर जय पांडे यास सकारियाच्या गोलंदाजीवर हार्विक पटेलने टिपले, तर त्यानंतर केवळ एक धाव करून नौशाद शेखही उनाडकटच्या गोलंदाजीवर हार्विकच्याच हाती झेल देऊन तंबूत परतला. यावेळी संघाची धावसंख्या अवघी १८ होती. त्यानंतर चिराग खुराणा आणि केदार जाधव यांनी डाव सावरला. चिरागचा जम बसल्याचे वाटत असतांनाच ३० धावांवर धर्मेंद्रसिंह जडेजाने त्यास बाद केले. दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा केदार पाच चौकारांसह ३८ धावांवर खेळत होता.

Story img Loader