आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आगामी काळात कसोटी क्रिकेटमधील नाणेफेक रद्द करण्याची शक्यता आहे. २८-२९ मे रोजी मुंबईत होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीत यावर चर्चा होणार असल्याचे समजते आहे. या प्रस्तावाबाबत नुकताच भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याला त्याचे मत विचारण्यात आले. इडन गार्डन्स येथे तो पत्रकारांशी बोलत होता.

नाणेफेक रद्द होण्याबाबतच्या प्रस्तावावर बोलताना तो म्हणाला की याबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. हा केवळ एक प्रस्ताव आहे. यावर विचारपूर्वक निर्णय घेतला जाईल. मात्र, नाणेफेक रद्द करण्यात येऊ नये, असे माझे वैयक्तिक मत आहे.

या संदर्भात अजून निर्णय झालेला नाही. हा प्रस्ताव मान्य होईल की नाही हेदेखील पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे. यजमान संघ नाणेफेक जिंकल्यास त्यांना त्याचा फायदा होतो. पण जर यजमान संघाने नाणेफेक गमावली, तर तो फायदा मिळण्याचा प्रश्नच उरत नाही, असेही गांगुली म्हणाला.

“कसोटी सामन्याची खेळपट्टी तयार करताना यजमान संघाचं मत विचारात घेतलं जाणं हा सध्या कळीचा मुद्दा बनलेला आहे. बहुतांश सदस्यांनी नाणेफेकीऐवजी पाहुण्या संघाच्या कर्णधाराला गोलंदाजी किंवा फलंदाजी निवडण्याचा अधिकार द्यावा”, असं मत व्यक्त केलं आहे, असे आयसीसीच्या एका अधिकाऱ्याने एका संकेतस्थळाला माहिती देताना सांगितले होते. त्यामुळे या मुद्द्यावर साधकबाधक चर्चा होणार असून अशा परिस्थितीमध्ये जर हा प्रस्ताव संमत झाला, तर पाहुण्या संघाच्या कर्णधाराला प्रथम फलंदाजी करायची की गोलंदाजी करायची? या बाबत निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले जाऊ शकते.