भारतीय संघ २१ नोव्हेंबरपासून ३ टी२०, ४ कसोटी आणि ३ वन-डे सामन्याची मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यातील दिवस-रात्र कसोटी सामन्याबद्दलचे वाद संपता संपत नाहीयेत. भारतीय संघ दिवस रात्र कसोटी सामना खेळणार नसल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केल्यानंतर आता भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने या वादात उडी घेतली आहे.
कसोटी मालिकेतील अॅडलेड येथे होणारा पहिला सामना दिवस रात्र पद्धतीचा असावा, असा आग्रह क्रिकेट ऑस्टेलियाने धरला होता. त्यानंतर बीसीसीआयने त्यास नकार दिला. त्यावर उत्तर देताना क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स सदरलँड यांनी भारत पराभवाला घाबरत असल्याने दिवस रात्र कसोटी खेळ नसल्याचे म्हटले होते.
यावर गांगुलीने उत्तर देत क्रिकेट ऑस्ट्रेलियाला चपराक लगावली आहे. भारतीय संघात प्रतिभावान खेळाडू आहेत आणि ते खेळाडू दिवस रात्र कसोटी जिंकू शकतात, असा विश्वास दादाने व्यक्त केला आहे.
तो म्हणाला की भारत दिवस-रात्र कसोटी खेळू शकतो आणि जिंकू शकतो. दिवसा खेळल्या जाणाऱ्या जाणीव दिवस रात्र पद्धतीच्या कसोटी सामन्यांमध्ये काहीही फरक नाही. केवळ चेंडूचा रंग वेगळा असतो. बाकी सगळे सारखेच असते. दिवस रात्र कसोटी हे क्रिकेटचे भविष्य आहे. त्यामुळे भारताचा संघही लवकरच दिवस रात्र कसोटी खेळेल, असेही तो म्हणाला.