* ओझाच्या फिरकीपुढे इंग्लंडचा पहिला डाव कोसळला
* फॉलो-ऑननंतर इंग्लंडची दुसऱ्या डावात सावध सुरुवात
* अॅलिस्टर कुकने साकारले अर्धशतक
क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, हेच खरे. वर्षभरापूर्वी इंग्लिश भूमीवरून ४-० अशी कोरी पाटी घेऊन परतलेला भारतीय संघ मायदेशात मात्र ढाण्या वाघासारखा आत्मविश्वासाने वावरतो आहे. पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताने इंग्लंडवर ३३० धावांच्या भरभक्कम आघाडीसह फॉलो-ऑन लादण्याची किमया साधली. त्यानंतर मात्र कसोटी वाचविण्यासाठी इंग्लिश लढा सुरू झाला. दुसऱ्या डावात सावधगिरीने फलंदाजी करीत इंग्लंड संघाने आपली झुंज शाबूत ठेवली आहे.
फिरकी गोलंदाज प्रग्यान ओझाचे ४५ धावांत ५ बळी आणि आर. अश्विनने घेतलेल्या ३ बळींच्या बळावर भारताने इंग्लंडचा पहिला डाव फक्त १९१ धावांत गुंडाळण्याची किमया साधली. त्यामुळे भारताने इंग्लंडवर फॉलो-ऑन लादला,पण त्यानंतर इंग्लिश कर्णधार अॅलिस्टर कुक (खेळत आहे ७४) आणि निक कॉम्प्टन (खेळत आहे ३४) यांनी समर्थपणे खेळत तिसऱ्या दिवसअखेर बिनबाद १११ अशी मजल मारली आहे. अद्याप पाहुणा संघ २१९ धावांनी पिछाडीवर आहे.
सामन्याचे अजून दोन दिवस शिल्लक असताना चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळवण्याची नामी संधी भारताकडे चालून आली आहे. सरदार पटेल स्टेडियमवरील धिम्या खेळपट्टीवर इंग्लंड संघाला कसोटी सामना वाचविण्यासाठी शर्थीने झुंज द्यावी लागणार आहे. फॉलो-ऑननंतर पाहुण्या संघाने दुसऱ्या डावात चांगली फलंदाजी केली.
डावखुरा फिरकी गोलंदाज ओझाने आपल्या १७व्या कसोटी सामन्यात चौथ्यांदा पाच बळी घेण्याची किमया साधली. अश्विनने त्याला साथ देताना ८० धावांत ३ बळी घेतले.
लवकर उरकण्यात आलेल्या चहापानानंतर इंग्लंडने दुसऱ्या डावाला प्रारंभ केला. कुक आणि पदार्पणवीर कॉम्प्टन यांनी नाबाद शतकी सलामी देत डावाने पराभव टाळण्याचा आपला इरादा स्पष्ट केला.
पहिल्या डावातील अपयश झटकून फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडच्या सलामीच्या जोडीने अश्विन आणि ओझा या दोघांचाही आत्मविश्वासाने सामना केला.
धावफलक
भारत (पहिला डाव) : ८ बाद ५२१ (डाव घोषित).
इंग्लंड (पहिला डाव) : अॅलिस्टर कुक झे. सेहवाग गो. अश्विन ४१, निक कॉम्प्टन त्रिफळा गो. अश्विन ९, जेम्स अँडरसन झे. गंभीर गो. ओझा २, जोनाथन ट्रॉट झे. पुजारा गो. अश्विन ०, केव्हिन पीटरसन त्रिफळा गो. ओझा १७, इयान बेल झे. तेंडुलकर गो. ओझा ०, समित पटेल पायचीत गो. यादव १०, मॅट प्रायर त्रिफळा गो. ओझा ४८, टिम ब्रेसनन झे. कोहली गो. ओझा १९, स्टुअर्ट ब्रॉड पायचीत गो. खान २५, ग्रॅमी स्वान नाबाद ३, अवांतर १७, एकूण ७४.२ षटकांत सर्व बाद १९१
बाद क्रम : १-२६, २-२९, ३-३०, ४-६९, ५-६९, ६-८०, ७-९७, ८-१४४, ९-१८७
गोलंदाजी : आर. अश्विन २७-९-८०-३, झहीर खान १५-७-२३-१, प्रग्यान ओझा २२.२-८-४५-५, युवराज सिंग ७-२-१४-०, उमेश यादव ७-२-१४-१.
इंग्लंड (दुसरा डाव) : अॅलिस्टर कुक खेळत आहे ७४, निक कॉम्प्टन खेळत आहे ३४, अवांतर ३, एकूण ३८ षटकांत बिनबाद १११
गोलंदाजी : उमेश यादव ७-१-१५-०, प्रग्यान ओझा १४-३-३४-०, आर. अश्विन १४-३-४९-०, वीरेंद्र सेहवाग १-०-१-०, झहीर खान १-०-१-०, सचिन तेंडुलकर १-०-८-०.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा