भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर (बीसीसीआय) पुन्हा परतण्यासाठी उत्सुक असलेले आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांचे भवितव्य १७ जानेवारीला स्पष्ट होणार आहे. मोदी यांनी राजस्थान क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक लढवली असून १७ जानेवारीला निवडणुकीचे निकाल जाहीर केले जाणार आहेत.
संघटनेची निवडणूक उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली होत असून न्यायालयाने निकालाचे बंद पाकीट १७ जानेवारी रोजी उघडण्याचे निश्चित केले आहे. मोदी यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप ठेवत बीसीसीआयने मोदी यांच्यावर तहहयात बंदी घातली आहे. त्यामुळेच मोदी यांच्या निवडणुकीबाबत बीसीसीआयने आक्षेप घेतला आहे. मोदी यांना निवडणूक लढविण्यास मनाई करावी, असा अर्ज बीसीसीआयने न्यायालयात सादर केला आहे. त्यांच्या अर्जावर न्यायाधीश ए. आर. दवे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी सुरू आहे. बीसीसीआयच्या अर्जाबाबत न्यायालयाने म्हटले आहे की, ‘‘मोदी जर निवडून आले तरच बीसीसीआयने घेतलेल्या आक्षेपांबाबत विचार करता येईल. १७ जानेवारीला निकाल जाहीर झाल्यानंतरच त्या दिवशी आक्षेपांबाबत सुनावणी होईल.’’
राजस्थानच्या क्रीडा कायद्यानुसार मोदी यांना संघटनेची निवडणूक लढविण्याचा अधिकार मिळाला आहे. मात्र बीसीसीआयने या कायद्यातील तरतुदीस आव्हान दिले आहे. मात्र मोदी यांना निवडणूक लढविण्याचा पूर्ण हक्क असल्याचा व त्यांचा अर्ज वैध असल्याचा निर्णय उच्च न्यायालयानेच दिला होता. त्यामुळे मोदी यांचा निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा झाला होता.

Story img Loader