सर्वोच्च न्यायालयात आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील भ्रष्टाचार प्रकरणाची पुढील सुनावणी २५ मार्च रोजी होणार आहे. याबाबत मुदगल समितीने तयार केलेल्या अहवालावर ही सुनावणी होईल.
मुदगल समितीने १० फेब्रुवारी रोजी न्यायालयाच्या ए. के. पटनाईक व जे. एस. खेहर यांच्या खंडपीठाकडे हा अहवाल सादर केला होता. या अहवालातील तपशील गोपनीय राहावा, अशी विनंती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय)न्यायालयाला केली होती.
क्रिकेट या खेळात अनेक अवैध गैरव्यवहार सुरू असल्याचे मत या अहवालात व्यक्त करण्यात आल्याचे समजते. त्यातील अनेक माहिती खळबळजनक स्वरूपाची असून त्यामुळे अनेक क्रिकेटपटू व बीसीसीआय यांच्या प्रतिष्ठेस तडा जाईल म्हणून हा अहवाल प्रसिद्ध करू नये, अशीही विनंती बीसीसीआयने केली आहे.
हा अहवाल गोपनीय असला, तरी सध्याच्या भारतीय क्रिकेट संघातील अनेक खेळाडू क्रिकेटच्या भ्रष्टाचारात अडकले आहेत, असे समजते. भ्रष्टाचारात अडकलेल्या खेळाडूंबरोबरच अन्य काही प्रामाणिक खेळाडूही विनाकारण बदनाम होण्याची शक्यता आहे. असे होऊ नये म्हणूनच न्यायालयाने हा अहवाल न्यायालयातही सविस्तरपणे सांगू नये, अशीही विनंती बीसीसीआयने न्यायालयाला केली आहे.  
आयपीएल स्पर्धा ही व्यापारी तत्त्वावर आयोजित केली जाणारी स्पर्धा असून बीसीसीआयतर्फे त्यांच्या फ्रँचायझींद्वारा या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे.  सध्याची आयपीएल स्पर्धा बीसीसीआयच्या उद्देशाविरुद्ध चालली आहे. या  मुदगल समितीच्या या शेऱ्याबाबत बीसीसीआयने असहमती दर्शविली आहे. मुदगल समितीचे अध्यक्षपद उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मुकुल मुदगल यांच्याकडे आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मय्यप्पन यांचा क्रिकेट सट्टेबाजी व मॅच-फिक्सिंग प्रकरणात सहभाग असल्याचा तसेच चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या स्थापनेत  मोठा वाटा असल्याचा निष्कर्ष मुदगल समितीने काढला असल्याचे समजते.