भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्षपद माजी कर्णधार व समालोचक सुनील गावस्कर यांच्याकडे देण्याच्या निर्णयाचे चंदू बोर्डे, अजित वाडेकर, किरण मोरे आदी माजी कसोटीपटूंनी स्वागत केले आहे.

“सट्टेबाजी, मॅचफिक्सिंग आदी विविध कारणास्तव आयपीएल स्पर्धेची प्रतिमा ढासळली आहे. त्यामुळेच या स्पर्धेविषयी पुन्हा विश्वासार्हता निर्माण करणे, हे गावस्कर यांच्यापुढील पहिले आव्हान असणार आहे. गावस्कर यांच्यासारख्या पारदर्शी संघटकाकडे क्रिकेटचा कारभार दिल्यास त्यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचा कारभार अधिक पारदर्शी होईल. त्यामुळे कोणीही सट्टेबाजी किंवा अन्य गैरव्यवहार करण्यास धजावणार नाही. चिअरगर्ल्सऐवजी ज्येष्ठ खेळाडूंना महत्त्व दिले जाईल.”
-चंदू बोर्डे

“गावस्करकडे मंडळाचे अध्यक्षपद देण्याचा निर्णय कौतुकास्पद आहे. यामुळे मंडळाचा कारभार पारदर्शी पद्धतीने होईल व खेळाडूंना खेळाच्या व्यवस्थापनात अधिकाधिक संधी मिळेल, गावस्कर यांनी दीर्घकाळ क्रिकेट सामने खेळले आहेत. त्यामुळे खेळाडूंना कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते याचा त्यांना बारकाईने अभ्यास आहे. त्याचा फायदा त्यांना मंडळाच्या कारभारात होईल.”
अजित वाडेकर

“अनेक गैरव्यवहारांमुळे भारतामधील क्रिकेटची प्रतिमा मलीन झाली होती. गावस्कर यांच्यासारख्या कुशल संघटकांकडे मंडळाचे अध्यक्षपद देत न्यायालयाने क्रिकेटचाच गौरव केला आहे. आयपीएल स्पर्धेचे योग्यरीतीने आयोजन करण्याची मुख्य जबाबदारी गावस्कर यांच्याकडे आली आहे.”
किरण मोरे

Story img Loader