त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव येथे बालिकेवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्यानंतर मागील आठवडय़ात जिल्ह्य़ात उसळलेल्या जनक्षोभाचा फटका जिल्हास्तरीय शालेय सायकल स्पर्धेलाही बसला आहे. शहर व परिसरातील बिघडलेल्या परिस्थितीमुळे ही स्पर्धा झालेली नसताना विभागीय सायकल स्पर्धा मात्र १९ ऑक्टोबर रोजी होणे नियोजित असल्याने ही स्पर्धा पुढे ढकलण्याची मागणी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी विभागीय क्रीडा उपसंचालकांकडे केली आहे.

राज्याच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने नाशिक विभागात २०१६-१७ या वर्षांत आयोजित विविध क्रीडा स्पर्धाच्या तारखांमध्ये आतापर्यंत अनेक वेळा बदल करण्यात आले आहेत. त्यात आता तळेगाव प्रकरणामुळे स्पर्धेच्या तारखांमध्ये बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नाशिकमधील दंगलसदृश्य परिस्थितीमुळे जिल्हा शालेय सायकल स्पर्धा होऊ शकली नाही. पोलीस प्रशासनाकडूनही जमावबंदी आदेश असल्याने सदरच्या स्पर्धा आयोजनास परवानगी नाकारली. त्यामुळे अद्याप जिल्हास्तरीय स्पर्धा झालेल्या नाहीत. ही परिस्थिती असताना दुसरीकडे विभागीय स्पर्धा मात्र १९ ऑक्टोबर रोजी घेण्याचे नियोजन आहे. जिल्हा स्पर्धा झालेली नसताना खेळाडू विभागीय स्पर्धेत भाग घेऊ शकणार नसल्याने विभागीय स्पर्धा पुढे ढकलण्याची मागणी जिल्हा क्रीडा अधिकारी संजय सबनीस यांनी विभागीय उपसंचालकांकडे केली आहे. जिल्हा सायकल स्पर्धेविषयी जिल्हा सायकलिंग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील तारीख निश्चित करण्यात येणार असल्याचेही सबनीस यांनी नमूद केले आहे.

दरम्यान, १४, १७ आणि १९ वर्षांआतील मुले, मुलींच्या विभागीय शालेय टेबल टेनिस स्पर्धाचे आयोजन २० व २१ ऑक्टोबर रोजी नाशिक येथे करण्याचे ठरले होते. परंतु, याच कालावधीत संघटनेच्या राज्य अजिंक्यपद स्पर्धा असल्याचे लक्षात आल्यानंतर शालेय विभागीय टेबल टेनिस स्पर्धेच्या तारखांमध्ये बदल करणे आवश्यक झाले आहे. या स्पर्धा आता १० व ११ नोव्हेंबर रोजी घेण्याची तयारी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी दर्शविली आहे. याशिवाय विभागीय शालेय किकबॉक्सिंग स्पर्धेच्या तारखेतही बदल होणे निश्चित आहे. नियोजनानुसार १८ नोव्हेंबर रोजी ही स्पर्धा होणार होती. परंतु, या कालावधीत संघटनेचे बहुतांश अधिकारी व पंच हे नाशिकमध्ये उपस्थित नसल्याने ही स्पर्धा २९ व ३० नोव्हेंबर रोजी घेण्यासाठी संघटनेची तयारी असल्याचेही जिल्हा क्रीडा अधिकारी सबनीस यांनी नमूद केले.

 

Story img Loader