जबर अपघातानंतर आयुष्याशी झगडत असलेला ‘फॉम्र्युला-वन’चा महान ड्रायव्हर मायकेल शूमाकरच्या चाहत्यांसाठी थोडी आनंदाची बातमी असून अपघातानंतर गेल्या आठ दिवसांमध्ये पहिल्यांदाच शूमाकरच्या तब्येतीमध्ये किंचितशी सुधारणा झाली असल्याचे सूत्रांकडून समजते आहे.
आठ दिवसांपूर्वी स्कीइंग करताना शूमाकरचा मोठा अपघात झाला होता आणि त्यानंतर तो कोमामध्ये गेला होता. अपघातानंतर शूमाकरची तब्येत स्थिर असली तरी त्याच्या जिवाला धोका आहे, असे त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले होते. पण आता त्याच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत असून त्याच्या हितचिंतकांसाठी हा एक आशेचा किरण असेल. ‘‘शूमाकरची तब्येत स्थिर आहे आणि आम्ही त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. शूमाकरच्या जिवाचा धोका अजूनही पूर्णपणे टळलेला नाही. रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांच्या मागणीनुसार आम्ही त्याच्या उपचाराबद्दल कोणतीही सखोल माहिती देऊ शकत नाही. त्यामुळेच आम्ही कोणतीही पत्रकार परिषद किंवा पत्रक नजीकच्या भविष्यात काढणार नाही,’’ असे ग्रेनोबल विद्यापीठ इस्पितळाच्या पत्रकात म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शूमाकरच्या पत्नीची आर्जवी विनंती
प्रसारमाध्यमांनी रुग्णालयापासून दूर राहावे!
बर्लिन : प्रसारमाध्यमांनी माझे कुटुंबीय तसेच फ्रेंच रुग्णालयापासून दूर राहावे व आम्हाला आमचे खासगी जीवन शांतपणे जगण्याची संधी द्यावी, अशी विनंती फॉम्र्युला-वनचा बादशाह मायकेल शूमाकरची पत्नी कोरिनाने केले आहे.  स्कीइंग करताना झालेल्या अपघातात मायकेलच्या मेंदूला मोठी दुखापत झाली असून, तो सध्या अत्यवस्थ आहे. कोरिना म्हणाली, ‘‘आम्हा कुटुंबीयांना मायकेलसमवेत राहू द्यावे तसेच सतत चौकशी न करता वैद्यकीयतज्ज्ञांना त्यांचे काम सुलभपणे करण्याचे स्वातंत्र्य द्यावे. जर त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार होत राहिला, तर त्यांना काम करणे शक्य होणार नाही. वैद्यकीय तज्ज्ञ व मायकेलचे व्यवस्थापक यांनी दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवावा.’’ दरम्यान, मायकेलच्या निकटवर्तीयाने दिलेल्या माहितीनुसार, मायकेलच्या प्रकृतीत थोडीशी सुधारणा दिसून येत असल्याचे समजते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Schumachers health shows slight improvement source