AUS vs SCO match Josh Inglis 2nd century in T20I : ऑस्ट्रेलियाचा स्फोटक यष्टीरक्षक-फलंदाज जोश इंगलिसने स्कॉटलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात अवघ्या ४३ चेंडूत शतक झळकावले. यासह, तो आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये ऑस्ट्रेलियासाठी सर्वात जलद शतक झळकावणारा फलंदाज बनला. त्याने ॲरॉन फिंच आणि ग्लेन मॅक्सवेल यांचा विक्रम मोडला, ज्यांनी प्रत्येकी ४७ चेंडूत शतके झळकावली होती. इंगलिसचे टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हे दुसरे शतक आहे. आता त्याने टी-२० इंटरनॅशनलमध्ये दोन किंवा अधिक शतके झळकावणाऱ्या फिंच आणि मॅक्सवेलच्या यादीत स्थान मिळवले आहे.

शुक्रवारी ६ सप्टेंबर रोजी एडिनबर्ग येथे झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी केली. गेल्या सामन्यातील स्टार सलामीवीर ट्रॅव्हिस हेड दुसऱ्याच षटकात खाते न उघडता बाद झाला, तर दुसरा युवा सलामीवीर जेक फ्रेझर मॅकगर्क हाही चौथ्याच षटकात पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर आलेल्या यष्टिरक्षक-फलंदाज जोश इंगलिसने फार वेळ न घालवता जबाबदारी स्वीकारली आणि आक्रमण सुरु केले. यादरम्यान इंगलिसने अवघ्या २० चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.

सलग दोन षटकार मारून शतक पूर्ण केले –

यानंतरही इंगलिसने आक्रमण सुरूच ठेवले आणि कॅमेरून ग्रीनसह डाव पुढे नेला. त्यानंतर ग्रीन बाद झाल्यानंतरही इंगलिस थांबला नाही आणि १८व्या षटकात आपले शतक पूर्ण केले. त्याने सलग २ षटकारांसह अवघ्या ४३ चेंडूत दुसरे टी-२० आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण केले. अशा प्रकारे त्याने माजी कर्णधार ॲरॉन फिंच आणि स्टार अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल यांचा ऑस्ट्रेलियासाठी सर्वात जलद शतकाचा विक्रम मोडला. अखेर १९व्या षटकात इंगलिस बाद झाला. त्याने अवघ्या ४९ चेंडूत १०३ धावा केल्या, त्यापैकी ७० धावा ७ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने केल्या.

हेही वाचा – R Ashwin : नितीश कुमार रेड्डीची खिल्ली उडवणाऱ्या पाकिस्तानी चाहत्याला अश्विनने शिकवला चांगलाच धडा, मीम्स व्हायरल

ऑस्ट्रेलियाने स्कॉटलंडला दिले १९७ धावांचे लक्ष्य –

इंगलिसच्या टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हे दुसरे शतक होते. यापूर्वी त्याने नोव्हेंबर २०२३ मध्ये विशाखापट्टणम येथे भारताविरुद्ध ११० धावांची इनिंग खेळली होती. आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये २ किंवा अधिक शतके झळकावणारा तो केवळ तिसरा ऑस्ट्रेलियन फलंदाज आहे. फिंचच्या नावावर २ आणि ग्लेन मॅक्सवेलच्या नावावर ५ शतके आहेत. मात्र, इंगलिसच्या या उत्कृष्ट शतकानंतरही ऑस्ट्रेलियन संघाला २० षटकांत केवळ १९६ धावा करता आल्या. इंग्लिश व्यतिरिक्त कॅमेरून ग्रीनने २९ चेंडूत ३६ धावा केल्या, तर शेवटी टीम डेव्हिडने ७ चेंडूत १७ धावा केल्या. स्कॉटलंडकडून ब्रॅड करीने ३ विकेट्स घेतल्या.