लॉर्ड्सवर शतक साकारण्याचे स्वप्न प्रत्येक क्रिकेटपटू जोपासतो. ते काहींचे पुरे होते, तर अनेकांचे अधुरे. पण गॅरी बॅलन्ससाठी लॉर्ड्स म्हणजे पर्वणी ठरले आहे. आपल्या कारकीर्दीतील पाचव्या कसोटीत खेळणाऱ्या २४ वर्षीय बॅलन्सने शुक्रवारी लॉर्ड्सवर आपले सलग दुसरे शतक झळकावण्याचा पराक्रम दाखवला. लॉर्ड्सवरील दर्दी क्रिकेटरसिकांनीही या अवलियाला यथोचित मानवंदना दिली. परंतु यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे इंग्लंडची आघाडीची फळी भुवनेश्वर कुमारच्या वेगवान माऱ्यापुढे ढासळल्यानंतर तो हिंमतीने मैदानावर उभा राहिला आणि इंग्लंड संघाचा ‘बॅलन्स’ सावरला. त्यामुळे ४ बाद १२५ अशा बिकट अवस्थेतील इंग्लंड संघाने दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ६ बाद २१९ अशी मजल मारली. तूर्तास, इंग्लंडचा संघ अद्याप ७६ धावांनी पिछाडीवर असून, ही कसोटी दोलायमान अवस्थेत आहे.
भुवनेश्वरने अॅलिस्टर कुक (१०) आणि सॅम रॉबसन (१७) या इंग्लंडच्या दोन्ही सलामीवीरांना मैदानावर स्थिरावण्याच्या आतच तंबूची वाट दाखवली. परंतु तिसऱ्या क्रमांकावरील बॅलन्सने इयान बेल (१६) आणि जो रूट (१३) यांच्यासोबत छोटेखानी भागीदाऱ्या करीत संघाची नौका सव्वाशेपर्यंत पोहोचवली. त्यानंतर मोइन अली (३२) सोबत त्याने पाचव्या विकेटसाठी ९८ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करून इंग्लंडच्या डावाला स्थर्य मिळवून दिले.
बिन्नीच्या ७७व्या षटकात बॅलन्सने तीन चौकारांनिशी हल्ला चढवून आपले शतक साजरे केले. बिन्नीच्या दुसऱ्या चेंडूवर मिडविकेटला चौकार ठोकून बॅलन्स ९५ धावांवरून ९९वर पोहोचला. मग चौथ्या चेंडूवर मिडविकेटला आणखी एक चौकार मारून बॅलन्सने शतकावर शिक्कामोर्तब केले. पुढच्या चेंडूवर बॅलन्सने आणखी एक चौकार मारला. महिन्याभरापूर्वी बॅलन्सने आपल्या कारकीर्दीतील पहिले शतक लॉर्ड्सवरच श्रीलंकेविरुद्ध (नाबाद १०४) झळकावले होते. त्यावेळी षटकार खेचून आपले शतक त्याने नोंदवले होते. कामचलाऊ फिरकी गोलंदाज मुरली विजयने अलीला बाद करून ही जोडी फोडली, तर भुवीने बॅलन्सला तंबूची वाट दाखवली. बॅलन्सने २०३ चेंडूंत १५ चौकारांसह ११० धावांची खेळी साकारली. खेळ थांबला तेव्हा लियाम प्लंकेट आणि मॅट प्रायर अनुक्रमे ४ आणि २ धावांवर खेळत होते. तथापि, भुवनेश्वरने ४६ धावांत ४ बळी घेण्याची किमया साधली.
तत्पूर्वी, भारताच्या पहिल्या दिवसाच्या ९ बाद २९० धावसंख्येमध्ये इशांत शर्मा (नाबाद १२) आणि मोहम्मद शमी (१९) यांनी फक्त १० चेंडू खेळत पाच धावांची भर घातली. बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर शमीचा पहिल्या स्लिपमध्ये कुकने झेल घेतला आणि भारताचा पहिला डाव संपुष्टात आला. कुकच्या कसोटी कारकीर्दीतील हा १००वा झेल ठरला.
धावफलक
भारत (पहिला डाव) : मुरली विजय गो. बॅलन्स झे. प्लंकेट २४, शिखर धवन झे. बॅलन्स गो. अँडरसन ७, चेतेश्वर पुजारा त्रि. गो. स्टोक्स २८, विराट कोहली झे. प्रायर गो. अँडरसन २५, अजिंक्य रहाणे झे. गो. अँडरसन १०३ महेंद्रसिंग धोनी झे. प्रायर गो. ब्रॉड १, रवींद्र जडेजा पायचीत गो. अली ३, स्टुअर्ट बिन्नी पायचीत गो. अँडरसन ९, भुवनेश्वर कुमार त्रि.गो. ब्रॉड ३६, मोहम्मद शमी झे. कुक गो. स्टोक्स १९, इशांत शर्मा नाबाद १२, अवांतर (बाइज १७, लेग बाइज १०, नो बॉल १) २८, एकूण ९१.४ षटकांत सर्व बाद २९५
बाद क्रम : १-११, २-४८, ३-८६, ४-११३, ५-१२३, ६-१२८, ७-१४५, ८-२३५, ९-२७५, १०-२९५
गोलंदाजी : जेम्स अँडरसन २३-७-६०-४, स्टुअर्ट ब्रॉड २२-५-७९-२, लिआम प्लंकेट १५-५-५१-१, बेन स्टोक्स १७.४-५-४०-२, मोइन अली १४-२-३८-१.
इंग्लंड (पहिला डाव) : अॅलिस्टर कुक झे. धोनी गो. कुमार १०, सॅम रॉबसन झे. धोनी गो. कुमार १७, गॅरी बॅलन्स झे. धोनी गो. कुमार ११०, इयान बेल झे. जडेजा गो. कुमार १६, जो रूट पायचीत जडेजा १३, मोईन अली पायचीत गो. विजय ३२, लियाम प्लंकेट खेळत आहे ४, मॅट प्रायर खेळत आहे २, अवांतर (बाइज १, लेग बाइज ९, वाइड २, नो बॉल ३) १५, एकूण ८६ षटकांत ६ बाद २१९
बाद क्रम : १-२२, २-३१, ३-७०, ४-११३, ५-२११, ६-२१४
गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार २३-९-४६-४, मोहम्मद शमी १५-५-३३-०, इशांत शर्मा १७-५-३२-०, स्टुअर्ट बिन्नी १०-०-४५-०, रवींद्र जडेजा १८-१-४१-१, मुरली विजय ३-०-१२-१.
‘बॅलन्स’ सावरला!
लॉर्ड्सवर शतक साकारण्याचे स्वप्न प्रत्येक क्रिकेटपटू जोपासतो. ते काहींचे पुरे होते, तर अनेकांचे अधुरे. पण गॅरी बॅलन्ससाठी लॉर्ड्स म्हणजे पर्वणी ठरले आहे.
First published on: 19-07-2014 at 07:04 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Scoring a hundred at lords is amazing ballance