नेदरलँड्सचा संघ २०११ नंतर वर्ल्डकपसाठी पात्र ठरला आहे. एक तपाच्या प्रतीक्षेनंतर नेदरलँड्स संघाचं वनडे वर्ल्डकपमध्ये खेळण्याचं स्वप्न पूर्ण होत आहे. जून महिन्यात झालेल्यात पात्रता फेरी स्पर्धेत वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेसारख्या अव्वल संघांना नमवत नेदरलँड्सने कष्टाने हे स्थान पटकावलं. दक्षिण आफ्रिकेसारख्या बलाढ्य संघाला चीतपट करण्याची किमया नेदरलँड्सने केली. प्रत्येक सामन्यात ते सातत्याने चांगलं खेळत आहेत. एवढ्या मोठ्या स्पर्धेत खेळण्याची संधी प्रदीर्घ कालावधीनंतर मिळूनही नेदरलँड्सच्या खेळात कोणतंही नवखेपण नाही. स्कॉट एडवर्ड्सचं नेतृत्व नेदरलँड्सच्या वाटचालीत ठसठशीतपणे अधोरेखित झालं आहे. स्कॉटची वैयक्तिक वाटचालही प्रेरणादायी अशी.
स्कॉटचा जन्म टोंगा या देशातला. ओशॅनिया खंडातला हा बेटस्वरुप देश आहे. लोकसंख्या जेमतेम लाखभर. नितळ, स्फटिकासारखं पाणी, निसर्गाची मुक्त उधळण असलेला इटुकला देश आहे. अगदी काही वर्ष टोंगात राहिल्यानंतर स्कॉटच्या घरचे ऑस्ट्रेलियात स्थायिक झाले. मेलबर्नचं उपनगर असलेल्या ब्लॅकबर्न भागात तो राहत असे. ऑस्ट्रेलिया हा क्रिकेटप्रेमी देश आहे. स्कॉटला या खेळाने आकर्षून घेतलं नसतं तरच नवल. रिचमंड नावाच्या जवळच्या क्लबसाठी तो खेळत असे. स्कॉटची आजी ही नेदरलँड्सची असल्याने त्याला व्हिसा मिळणं सुकर झालं.
साऊथ ऑस्ट्रेलियाचा खेळाडू अॅलेक्स रॉसच्या माध्यमातून नेदरलँड्समधल्या रॉटरडॅम शहरात एक्सेलिअर क्लबसाठी स्कॉट एक हंगाम खेळला. त्यानंतर तो पुन्हा ऑस्ट्रेलियाला गेला. नेदरलँड्समध्ये क्रिकेट मर्यादित प्रमाणात बहरलं आहे. स्कॉटच्या खेळाने नेदरलँड्स निवडसमितीचं लक्ष वेधून घेतलं. नेदरलँड्सच्या संघात विविध देशांमधून आलेल्या लोकांचा भरणा आहे. आपापली नोकरी तसंच व्यवसाय सांभाळून ते खेळतात. तोबिआस व्हिसे नावाच्या खेळाडूला दुखापत झाल्याने नेदरलँड्सच्या कोचिंग स्टाफमधील रायन कॅम्पबेलने स्कॉटला फोन केला. तू नेदरलँड्ससाठी खेळावंस असं सुचवलं. ऑस्ट्रेलियात राष्ट्रीय संघासाठी खेळण्याची संधी मिळणं दुरापास्त होतं. त्यामुळे स्कॉटने रायनच्या प्रस्तावाला होकार दिला. नामबियाविरुद्ध त्याने पदार्पण केलं. नेदरलँड्सच्या बोधचिन्हातला सिंह त्याने टॅटूच्या माध्यमातून शरीरावर कोरला. विकेटकीपिंग आणि बॅटिंग असं दोन्ही करत असल्याने नेदरलँड्स संघाचा फायदाच झाला. नेदरलँड्समध्ये ऑफ सीझन असताना मात्र स्कॉट ऑस्ट्रेलियाला जात असे.
नेदरलँड्सला अधिकाअधिक खेळण्याच्या संधी मिळणार आहेत हे स्पष्ट झाल्यानंतर स्कॉटने ऑस्ट्रेलियात मतदानाचा हक्क सोडून दिला. कामगिरीत सातत्य असल्याने स्कॉटचं नेदरलँड्स संघातलं स्थान पक्कं झालं. नियमित कर्णधार पीटर सिलारला दुखापतींनी ग्रासल्यामुळे स्कॉटकडे नेतृत्वाची धुरा देण्यात आली.
आणखी वाचा: डेव्हॉन कॉनवे-चांगल्या संधीच्या शोधात त्याने घर विकलं, गाडी विकली, देशही सोडला
वर्ल्डकप स्पर्धेत नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेसारख्या मोठ्या संघाला हरवलं. आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत नेदरलँड्सची अवस्था ११२/६ अशी झाली होती. स्कॉटने सुरुवातीला लोगन व्हॅन बीक आणि नंतर रोलॅफ व्हॅन डर मर्व्ह यांना साथीला घेत किल्ला लढवला. स्कॉटने १० चौकार आणि एका षटकारासह नाबाद ७८ धावांची खेळी केली. स्कॉटच्या प्रतिकारामुळेच नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेसमोर २४६ धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरादाखल खेळताना दक्षिण आफ्रिकेचा डाव २०७ धावांतच आटोपला. स्कॉटने तीन झेल घेत क्षेत्ररक्षणातही महत्त्वपूर्ण योगदान दिलं. स्कॉटलाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. वर्ल्डकपासाठी पात्र ठरण्यासाठी झालेल्या पात्रता फेरी स्पर्धेतही स्कॉटची बॅट तळपली होती. त्याने ६२च्या सरासरीने ३१४ धावा केल्या होत्या.
आम्ही भारतात मजा करायला आलेलो नाही. आम्ही फक्त शिकायला आलेलो नाही. अन्य संघ निश्चितच मोठे आहेत. त्यांच्याकडे खेळायचा अनुभव आहे. पण आम्ही चांगला खेळ करत त्यांना टक्कर देऊ असं स्कॉटने म्हटलं आहे. नेदरलँड्सच्या खेळातून याचा प्रत्यय येतो आहे.
स्कॉट नेदरलँड्समध्ये असतो तेव्हा त्याच्या राहण्याची व्यवस्था बोर्डाने केली आहे. जेव्हा तो ऑस्ट्रेलियात परततो तेव्हा ते घर विद्यार्थ्यांना राहण्यासाठी देतात. डर्क नॅन्स, टॉम कूपर यांच्याप्रमाणे मूळचे ऑस्ट्रेलियाचे पण नेदरलँड्ससाठी खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये स्कॉटचा समावेश झाला आहे. नेदरलँड्ससाठी खेळता खेळता त्याने ऑस्ट्रेलियातल्या गीलाँग शहरातल्या दिकीन विद्यापीठातून बॅचलर ऑफ बिझनेसचा अभ्यासक्रमही पूर्ण केला आहे.