संदीप कदम
मुंबई : दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचा पूर्णाकृती पुतळा साकारणे ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट आहे. एक कलाकृती म्हणून माझे आजवरचे हे सर्वोच्च काम आहे आणि ही संधी मिळणे माझ्यासाठी स्वप्न पूर्ण होण्यासारखी आहे, असे सचिन तेंडुलकरचा वानखेडेवर स्थापित करण्यात येणारा पुतळा साकारणारे शिल्पकलाकार प्रमोद कांबळे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
सचिन यांच्या पुतळय़ाचे काम करताना अनेक बारीक गोष्टींवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. यासाठी मला सचिन यांचे थोरले बंधू अजित तेंडुलकर यांची खूप मदत झाली, कारण त्यावेळेस सचिन इंग्लंडला गेले होते. पुतळय़ाचे काम करत असताना बुटाच्या आकारापासून बॅट कुठल्या दिशेला वळली पाहिजे, यावर मेहनत घेण्यात आली आहे. यासह सचिन यांची नजर व त्यांच्या हेल्मेटवरील लोगो या सर्व बारकाव्यांवर विशेष मेहनत घेतली गेली आहे, असे कांबळे म्हणाले.
मी पहिल्यापासूनच सचिन यांचा चाहता आहे. २०१२ साली ते प्रथम माझ्या संपर्कात आले. त्यावेळी एका कामासाठी त्यांनी मला मुंबईला बोलावले होते. त्यानंतर त्यांची अनेक कामे मी केली. सचिन यांचा पुतळा हा माझ्या अहमदनगर येथील कार्यशाळेत बनवण्यात आला आहे. यासाठी जवळपास आठ महिन्यांचा कालावधी लागला. सचिन यांची वेळ घेऊन या कामासाठी त्यांना भेटलो. याकरिता त्यांच्या काही चित्रांचे साहाय्यही घेतले. सचिन यांचे विविध फटके असल्याने त्यांच्याशी चर्चा करूनची पुतळय़ासाठी शैली ठरवण्यात आली. तसेच सध्या सुरू असलेल्या राम मंदिराच्या परिक्रमा मार्गातील रामायणावर आधारित प्रसंगांच्या शिल्पाचे कामही माझ्याकडे आहे, असे कांबळे यांनी सांगितले.
भारत-श्रीलंका सामन्यापूर्वी अनावरण
मुंबई क्रिकेट संघटनेकडून तयार करण्यात आलेल्या सचिन तेंडुलकरच्या पुतळय़ाचे अनावरण विश्वचषकाच्या भारत-श्रीलंका सामन्यापूर्वी १ नोव्हेंबरला करण्यात येणार आहे. हा पुतळा सचिन तेंडुलकर स्टॅन्ड आणि विजय र्मचट पॅव्हेलियनच्या दरम्यान उभारण्यात आला आहे, अशी माहिती मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अमोल काळे यांनी गुरुवारी दिली.
हेही वाचा >>>ODI World Cup 2023 ,AUS vs PAK: ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान आमनेसामने;विश्वचषकात आज दोन बलाढय़ संघांत लढत
पुतळय़ाची वैशिष्टय़े
’ सचिनची जी मुख्य मूर्ती आहे, त्याची उंची दहा फूट आहे. त्याच्यावर जी बॅट आहे ती चार फुटांची आहे. अशी एकूण १४ फूट उंचीची मूर्ती आहे. त्याच्या खाली जगाचे चिन्ह म्हणून क्रिकेटचा चेंडू साकारला आहे. ज्यामधून जगाचा नकाशा उलगडला आहे.
’ त्या चेंडूच्या पॅनलवर सचिनचे विक्रम हे नमूद केलेले आहेत. त्यामध्ये त्याच्या एकदिवसीय, कसोटी आणि मुंबईकडून खेळतानाची कामगिरी नमूद केलेली आहे. त्यात इतरही विक्रमांचा समावेश आहे. यासह सचिनच्या कामगिरीला उद्देशून एक वाक्यही असणार आहे.
’ सचिनचा हा पूर्णाकृती पुतळा कांस्याचा बनवला आहे. त्याच्या खाली असलेला चेंडूही कांस्याचा बनवण्यात आला आहे.
मुंबईतील सामन्यांसाठी विशेष सुविधा
मुंबईत सामना पाहण्यासाठी येणाऱ्या चाहत्यांसाठी मुंबई क्रिकेट संघटनेकडून चांगल्या व्यवस्था करण्यात आल्या आहेत. सर्व स्टेडियममध्ये पाण्याची सुविधा मोफत करण्यात आली असून जागोजागी डिस्पेन्सर ठेवण्यात येणार आहेत. यासह संपूर्ण स्टेडियममध्ये चाहत्यांच्या दृष्टीने बदल करण्यात आले आहेत. सामन्यासाठी मैदानाचा दर्जाही चांगला राखण्यात आला आहे. यासह पत्रकार कक्ष व अध्यक्षीय कक्ष याच्यातही सुधारणा करण्यात आली असल्याची माहिती काळे यांनी दिली. वानखेडेवर होणाऱ्या सामन्यांना चाहत्यांचा चांगला पाठिंबा लागेल असा विश्वासही काळे यांनी व्यक्त केला.