शॉन अ‍ॅबॉटचा चेंडू लागून ज्या खेळपट्टीवर फिलिप ह्य़ुजेस कोसळला, ती सिडनी क्रिकेट स्टेडियमवरील सात क्रमांकाची खेळपट्टी बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिडनी क्रिकेट स्टेडियमवर सध्या १० खेळपट्टय़ा असून त्यापैकी सात क्रमांकाची खेळपट्टी यापुढे तयार केली जाणार नाही, असे क्युरेटर टॉम पार्कर यांनी सांगितले.
पार्कर म्हणाले की, ‘‘फिलिप ह्य़ुजेसची परंपरा एखाद्या फलंदाजाने चालवावी, हे कुणालाही अपेक्षित नाही. कोणताही क्युरेटर अशाप्रकारची खेळपट्टी पुन्हा बनवणार नाही. त्यामुळे सिडनी स्टेडियमवरील सात क्रमांकाची खेळपट्टी बाद ठरवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. ह्य़ुजेसच्या मृत्यूने मला धक्का बसला आहे. मैदानावर कोणत्याही खेळाडूचा मृत्यू व्हावा, याचा विचारही मी कधी केला नव्हता. सध्या मी या खेळपट्टीला हात लावलेला नाही.’’