नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओसी) नव्या अध्यक्षपदाचे एक उमेदवार आणि जागतिक अॅथलेटिक्सचे अध्यक्ष सेबॅस्टियन को यांनी सोमवारी केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांची भेट घेऊन २०३६ ऑलिम्पिक आयोजनाविषयी त्यांच्या भावना जाणून घेतल्या. तसेच या दोघांत देशातील अॅथलेटिक्स विकासाबाबत चर्चा केली.

चार वेळा ऑलिम्पिक विजेते राहिलेले सेबॅस्टियन को हे आगामी ‘आयओसी’ निवडणुकीत अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. भारताचे समर्थन मिळवणे हा को यांच्या भारत दौऱ्याचा मुख्य भाग होता. या दरम्यान त्यांनी वेळ काढून क्रीडामंत्री मांडविया यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर सायंकाळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही औपचारिक भेट घेतली.

हेही वाचा >>>Vaibhav Suryavanshi IPL 2025 : १३ वर्षीय फलंदाजाने IPL मध्ये लिहिला नवा इतिहास, करोडपती होणारा ठरला सर्वात तरुण खेळाडू, कोणी लावली बोली?

भारताने गेल्याच महिन्यात २०३६ ऑलिम्पिक स्पर्धेच्या आयोजनाबाबत इरादा पत्र सादर केले आहे. मांडविया यांनी को यांना ऑलिम्पिक आयोजनामागील सर्व योजना आणि मुख्य हेतू सांगितला. भारताची ऑलिम्पिक आयोजित करण्याची महत्त्वाकांक्षा असून, देशाचा सांस्कृतिक आणि क्रीडा वारसा जगासमोर दाखविण्यासाठी आम्ही इच्छुक आहोत. या मोहिमेत सरकार, उद्याोगविश्व आणि सर्व जनतेचा आम्हाला पाठिंबा आहे, असे मांडविया म्हणाले.