आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तेजक सेवनामुळे दोषी आढळणाऱ्या खेळाडूंबाबत जे काही दावे केले जात आहेत, ते दावे म्हणजे अ‍ॅथलेटिक्स या माझ्या खेळाविरुद्ध युद्धच पुकारले गेले आहे, असे माजी ऑलिम्पिक विजेते धावपटू व आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाच्या (आयएएएफ) अध्यक्षपदाचे उमेदवार सेबॅस्टियन को यांनी सांगितले.
को यांनी १५०० मीटर धावण्याच्या शर्यतीत दोन वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळविले आहे. आयएएएफचे अध्यक्ष लॅमिन दियाक यांची मुदत संपत असून १९ ऑगस्ट रोजी त्यांचा वारसदार निवडला जाणार आहे. त्यासाठी को यांच्याबरोबरच माजी पोलव्हॉल्ट विश्वविक्रमी धावपटू सर्जी बुबका हे रिंगणात आहेत. को हे आयएएएफचे उपाध्यक्ष आहेत. आयएएएफच्या सांख्यिकी अहवाल फुटला असल्याचे समजते. या अहवालानुसार २००१ ते २०१२ या कालावधीत १२ हजार पेक्षा जास्त खेळाडूंची उत्तेजक चाचणी घेण्यात आली. त्यापैकी आठशे खेळाडू दोषी आढळले आहेत. आयएएएफने ही आकडेवारी चुकीची असल्याचा व काही जण हेतूपूर्वक सामान्य लोकांची दिशाभूल करीत असल्याचा दावा केला आहे.
को यांनी ही गोष्ट अतिशय गंभीर असल्याचे मत व्यक्त करीत सांगितले, काही देशांनी या समस्येकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे. विशेषत: प्रगत देशांमधील खेळाडू पैसा व प्रसिद्धी मिळविण्यासाठी अनैतिक मार्गाचा अवलंब करीत असल्याचे अनेक वेळा दिसून आले आहे. या देशांकडून उत्तेजक प्रतिबंधकासाठी अपेक्षेइतके प्रयत्न केले जात नाहीत. आतापर्यंत याबाबत जी काही उपाययोजना केली आहे, ती खूप कमी पडत आहे. खेळाची प्रतिष्ठा राखण्यासाठी ठोस उपाययोजनांची आवश्यकता आहे.

Story img Loader