ज्या क्षणाची उत्कंठता गेल्या काही दिवसांपासून ताणून धरली गेली आहे, तो अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. रविवारी भारतातील फॉम्र्युला-वन चाहत्यांना दुग्धशर्करा योग अनुभवण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. वेगाचा सम्राट अशी बिरुदावली मिरवणारा रेड बुलचा सेबॅस्टियन वेटेल सलग चौथ्या विश्वविजेतेपदाच्या सिंहासनावर आरूढ होण्यासाठी सज्ज झाला आहे. रविवारी ग्रेटर नोएडातील बुद्ध इंटरनॅशनल सर्किटवर रंगणाऱ्या इंडियन ग्रां. प्रि. शर्यतीत वेटेलच्या विश्वविजेतेपदावर शिक्कामोर्तब होण्याची फक्त औपचारिकताच शिल्लक राहिली आहे. पात्रता शर्यतीत अव्वल स्थान (पोल पोझिशन) पटकावून वेटेल इंडियन ग्रां. प्रि. शर्यतीत जेतेपदांची हॅट्ट्रिक साजरी करण्यासाठी उत्सुक आहे.
फॉम्र्युला-वनमध्ये सद्यस्थितीला वेटेलला टक्कर देणारा एकही ड्रायव्हर नाही, असे बोलले जाते. सुरुवातीच्या शर्यतींपासूनच वेटेलने या मोसमावर वर्चस्व गाजवायला सुरुवात केली होती. पण पहिल्या टप्प्यात वेटेलला फेरारीचा फर्नाडो अलोन्सो आणि लोटसच्या किमी रायकोनेनचे कडवे आव्हान मिळाले. पण दुसऱ्या सत्रात वेटेल सुसाट सुटला. दुसऱ्या सत्रात झालेल्या पाच शर्यतींमध्ये वेटेलला एकदाही जेतेपदाने हुलकावणी दिली नाही. त्यामुळे आव्हान देऊ पाहणाऱ्या फर्नाडो अलोन्सोला त्याने ९० गुणांनी मागे टाकले. आता वेटेलला रविवारी होणाऱ्या शर्यतीत उतरायचे आहे ते विश्वविजेतेपदाची माळ गळ्यात घालण्यासाठीच. वेटेलला विश्वविजेतेपदापासून रोखणे अशक्य असल्यामुळे अलोन्सो आणि त्याच्या फेरारी संघानेही शरणागती पत्करली आहे.
घरच्या सर्किटवर शर्यत रंगणार असली तरी फोर्स इंडियाचे चैतन्य मात्र हरपून गेले आहे. या शर्यतीसाठी एकही भारतीय ड्रायव्हर नसल्यामुळे घरच्या चाहत्यांना फोर्स इंडियाकडून चांगली कामगिरी अपेक्षित होती. पण शर्यतीआधीच आपण हरलो, असे सांगत फोर्स इंडियाने नांगी टाकली आहे.
विश्वविजेतेपदाचा फैसला रविवारी लागेल, पण सांघिक अजिंक्यपदासाठी (कंस्ट्रक्टर्स चॅम्पियनशिप) आपले स्थान बळकट करण्यासाठी सर्वच संघांनी कंबर कसली आहे. वेटेल आणि मार्क वेबर यांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे रेड बुलने आधीच सांघिक जेतेपदावर कब्जा केला आहे. पण सर्वात जास्त रकमेचे बक्षीस पटकावण्यासाठी आता दुसऱ्या क्रमांकासाठी चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे. फेरारी, मर्सिडिझ आणि फॉर्मात असलेला लोटस अशी तिहेरी टक्कर दुसऱ्या क्रमांकासाठी रंगणार आहे. फोर्स इंडिया संघ सहाव्या क्रमांकावर समाधान मानणार असला तरी वेगाने गुणांचा आलेख उंचावणाऱ्या सौबेरचा भारतीय संघाला धोका असेल. तळाच्या क्रमांकावर असणाऱ्या मॉरिस्सिया आणि कॅटरहॅम या संघांनी आतापर्यंत एकही गुण मिळवला नसल्यामुळे १०व्या क्रमांकासाठी त्यांना झगडावे लागेल.

Story img Loader