कर्णधार सुनील छेत्री याच्या डबल धमाकाच्या जोरावर भारताने गुआमला ४-० अशी धूळ चारली आणि आशियाई चॅलेंज फुटबॉल स्पर्धेतील पात्रता फेरीत लागोपाठ दुसरा विजय नोंदविला.
अव्वल साखळी गटात भारताने पहिल्या सामन्यात चीन तैपेईला २-१ असे हरविले होते. भारताचे सहा गुण झाले असून चॅलेंज स्पर्धेतील मुख्य फेरीत स्थान मिळविण्याच्या त्यांच्या आशा कायम राहिल्या आहेत. त्यांना आता यजमान म्यानमार संघाशी खेळावे लागणार आहे.
भारताच्या विजयात छेत्रीचा सिंहाचा वाटा होता. त्याने उत्तरार्धात सामन्याच्या ४९ व्या मिनिटाला गोल करीत संघाचे खाते उघडले. तसेच त्याने ९१ व्या मिनिटाला स्वत:चा दुसरा गोल केला. क्लिफोर्ड मिरांडा याने ६७ व्या मिनिटाला भारताचा दुसरा गोल नोंदविला तर जेवेल राजा याने ८० व्या मिनिटाला भारतास ३-० अशी आघाडी मिळवून दिली होती.  या सामन्यातील पूर्वार्धात भारतास गोल करण्याच्या संधी मिळाल्या मात्र गोल करण्यासाठी त्यांना सूर सापडला नाही. गुआमच्या बचावफळीतील खेळाडूंनी भारताच्या अनेक चाली थोपवून धरल्या.